वृत्तसंस्था/ पॅरिस
येथे सुरू असलेल्या प्रेंच खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची दुहेरी ऑलिम्पिक विजेती पीव्ही सिंधूने महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
भारताच्या तृतिय मानांकित पीव्ही सिंधूने महिला एकेरीच्या दुसऱया फेरीतील सामन्यात डेन्मार्कच्या लिने ख्रिस्टोफर्सनचा 21-19, 21-9 अशा सरळ गेम्समध्ये 37 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना थायलंडच्या बुसानेनविरुद्ध होणार आहे. गेल्या आठवडय़ात झालेल्या डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूने बुसानेनचा पराभव केला होता.
पुरुष दुहेरीच्या विभागात भारताच्या सात्विक साईराज-चिराग शेट्टी या पाचव्या मानांकित जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविताना आपल्याच देशाच्या एम. आर. अर्जुन-ध्रुव कपिला यांचा 15-21, 21-10, 21-19 असा पराभव केला. मात्र, पुरुष एकेरीत भारताच्या सौरभ वर्माचे आव्हान दुसऱया फेरीतच समाप्त झाले. जपानच्या निशिमोटोने सौरभ वर्मावर 21-12, 21-9 अशी मात केली. अन्य एका सामन्यात भारताच्या लक्ष्य सेनने सिंगापूरच्या लोह किनचा पराभव करत तिसऱया फेरीत प्रवेश मिळविला.