बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप : थायलंडच्या चोचुवाँगवर मात, अश्विनी-सिक्की रेड्डी पराभूत
वृत्तसंस्था /हुएल्व्हा, स्पेन
विद्यमान विजेत्या पीव्ही सिंधूने बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिने थायलंडच्या पॉर्नपावी चोचुवाँगचा पराभव केला. मात्र महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी यांचे आव्हान संपुष्टात आले.
जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असणाऱया सिंधूने चोचुवाँगचा 21-14, 21-18 असा पराभव करून आगेकूच केली. या स्पर्धेत सिंधूला सहावे मानांकन मिळाले असून चोचुवाँगविरुद्ध तिने आतापर्यंत आठपैकी 5 वेळा विजय मिळविला आहे. याच महिन्यात झालेल्या वर्ल्ड टूर फायनल्समध्ये तसेच गेल्या मार्चमध्ये झालेल्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये चोचुवाँगने सिंधूला हरविले होते, त्या पराभवाची परतफेडही सिंधूने येथे केली. तिची पुढील लढत चिनी तैपेईच्या जागतिक अग्रमानांकित ताय झु यिंग हिच्याशी होणार आहे. यिंगने स्कॉटलंडच्या किर्स्टी गिल्मूरवर 21-10, 19-21, 21-11 असा संघर्षपूर्ण विजय मिळविला.
सिंधूने या लढतीत 5-1 अशी झटपट आघाडी घेतली. पण पॉर्नपावीने तिची आघाडी 5-4 अशी व नंतर 10-9 अशी कमी केली. यानंतर मात्र सिंधूने 15-10, 19-11 अशी मजल मारली आणि हा गेम जिंकून आघाडी घेतली. दुसरा गेम मात्र अटीतटीचा झाला. सिंधूने 3-0 अशी आघाडी घेत सुरुवात केली आणि ब्रेकपर्यंत तिने 11-6 अशी बढत घेतली होती.
ब्रेकनंतरच्या खेळात दीर्घ रॅलीज पहावयास मिळाल्या. त्यापैकी काही पॉर्नपावीने जिंकल्या. सिंधू 16-10 अशी पुढे असताना पॉर्नपावीने मुसंडी मारत सिंधूची आघाडी 18-15 अशी कमी केली. सिंधूने एक महत्त्वाची दीर्घ रॅली जिंकून 20-18 अशी बढत घेतली आणि नंतर गेम जिंकून पॉर्नपावीचे आव्हान संपुष्टात आणले. सिंधूला या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत बाय मिळाला होता तर दुसऱया फेरीत तिने स्लोव्हाकियाच्या मार्टिना रेपिस्काचा पराभव केला होता.
महिला दुहेरीत भारताच्या अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी यांना उपउपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. थायलंडच्या जाँगकोल्फान किटिथराकुल व रविंदा प्रजाँगजय यांच्याकडून त्यांना 13-21, 15-21 असा पराभव स्वीकारावा लागला. आधीच्या फेरीत त्यांनी चौदाव्या मानांकित जोडीला पराभवाचा धक्का दिला होता. पण त्या कामगिरीची पुनरावृत्ती त्यांना येथे करता आली नाही.