कोरिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : लक्ष्य सेन, मालविका बनसूद यांचे आव्हान मात्र समाप्त
वृत्तसंस्था /सुन्चेऑन
भारताची सातवी मानांकित महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू तसेच किदांबी श्रीकांत यांनी येथे सुरू असलेल्या कोरिया खुल्या सुपर 500 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र लक्ष्य सेन व मालविका बनसूद यांचे आव्हान समाप्त झाले. पुरूष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
दोनवेळा ऑलिम्पिक पदक मिळविणाऱया भारताच्या पीव्ही सिंधूने गुरूवारी झालेल्या महिला एकेरीच्या दुसऱया फेरीतील सामन्यात जपानच्या 26 व्या मानांकित अया ओहोरीचाह 21-15, 21-10 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना थायलंडच्या ओ.बुसानेनविरुद्ध होणार आहे. गेल्या महिन्यात झालेल्या स्वीस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिंधूने बुसानेनचा पराभव केला होता. महिला एकेरीच्या दुसऱया फेरीतील अन्य एका सामन्यात थायलंडच्या चोचूवाँगने भारताच्या मालाविका बनसूदवर 21-8, 21-14 अशा गेम्स्मध्ये केवळ 40 मिनिटात विजय मिळवित उपांत्यपूर्व फेरी गाठली.
पुरूष एकेरीच्या दुसऱया फेरीतील सामन्यात भारताच्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱया के. श्रीकांतने इस्त्रायलचा मिशा झिल्बरमनवर 21-18, 21-6 अशी मात करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. मात्र भारताच्या लक्ष्य सेनचे आव्हान दुसऱया फेरीत संपुष्टात आले. 24 व्या मानांकित शिसेर हिरेन रूस्टेव्हिटोने लक्ष्य सेनचा 33 मिनिटाच्या कालावधीत 22-20, 21-9 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. के. श्रीकांतचा उपांत्यपूर्व सामना कोरियाचा माजी टॉप सीडेड सन व्हेन हो याच्याविरुद्ध होणार आहे.
पुरूष दुहेरीच्या दुसऱया फेरीतील सामन्यात भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी सिंगापूरच्या टेरी व हेन यांचा 36 मिनिटाच्या कालावधीत 21-15, 21-19 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. भारताच्या एम.आर अर्जुन व ध्रृव कपिला यांनी दुसऱया फेरीतील सामन्यात पहिला गेम चालू असताना निवृत्तीचा निर्णय घेतल्याने इंडोनेशियाच्या मोहम्मद एहसान आणि सेटीवान यांचे उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित झाले.