सात्विक साईराज-चिराग शेट्टी यांचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ सुन्चेऑन
भारताचे अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू व किदाम्बी श्रीकांत यांनी येथे सुरू असलेल्या कोरिया ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीची उपांत्य फेरी गाठली.
तिसऱया मानांकित सिंधूने थायलंडच्या ओ. बुसाननवर 21-10, 21-16 असा विजय मिळविला. बुसाननवरील तिचा हा 17 वा विजय आहे. सिंधूची उपांत्य लढत दुसऱया मानांकित कोरियाच्या ऍन सेयुंगशी होणार आहे. गेल्या वर्षी सिंधूने तिच्यावर दोनदा विजय मिळविला होता. पुरुष एकेरीत दोन माजी अग्रमानांकितांमध्ये झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत भारताच्या के. श्रीकांतने स्थानिक खेळाडू सॉन वान हो याच्यावर 21-12, 18-21, 21-12 अशी मात केली. तासाहून अधिक काळ ही लढत रंगली होती. या दोघांत झालेल्या आतापर्यंतच्या अकरा लढतीत श्रीकांतचा हा चौथा विजय आहे. याआधीच्या मागील सलग तीन लढतीत श्रीकांत त्याच्याकडून पराभूत झाला होता. श्रीकांतने या लढतीत सॉनपेक्षा सरस खेळ करीत हा विजय मिळविला. पाचवे मानांकन असलेल्या श्रीकांतची उपांत्य लढत तिसऱया मानांकित इंडोनेशियाच्या जोनातन ख्रिस्तीशी होईल जोनातनने गेल्या आठवडय़ातच स्विस ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळविले आहे.
पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रनकिरेड्डी व चिराग शेट्टी यांनी झुंजार लढत दिली तरी त्यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. सात्विक-चिराग यांना कोरियाच्या कांग मिन्हयुक व सेओ स्य़ूंगजाए यांच्याकडून 20-22, 21-18, 20-22 असा पराभव स्कीकारावा लागला. एक तास 17 मिनिटे ही झुंज रंगली होती. आधीच्या फेरीत सात्विक-चिराने सिंगापूरच्या ही याँग काइ टेरी व लोह कीन हीन यांच्यावर मात केली होती.
महिला एकेरीच्या लढतीत बुसाननला हरविण्यात सिंधूला फारसे कष्ट पडले नाहीत. स्विस ओपन अंतिम लढतीतही सिंधूने तिला हरविले होते. पहिल्या गेममध्ये बुसाननने 5-2 अशी प्रारंभी आघाडी घेतली होती. यानंतर मात्र सिंधूचेच सामन्यावर पूर्ण वर्चस्व राहिले. तिने ब्रेकला 11-7 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर सलग आठ गुण घेत हा गेम सिंधूने जिंकला. दुसऱया गेममध्येही अशीच परिस्थिती राहिली. सिंधूने 8-2 अशी आघाडी घेतल्यानंतर ती वाढवत राहिली आणि बुसानन दबावाखाली कोसळत राहिली, ती अखेरपर्यंत सावरू शकली नाही.
पुरुष एकेरीच्या सामन्यात श्रीकांतने छोटय़ा रॅलीजवर सरस नियंत्रण ठेवत ब्रेकपर्यंत 11-6 अशी आघाडी घेतली. नेतर सॉन हो ने 12-14 अशी बढत मिळविली असली तरी श्रीकांतने गियर बदलत हा गेम जिंकून आघाडी मिळविली. दुसऱया गेममध्ये कोरियन खेळाडूने मुसंडी मारत 10-7 अशी बढत घेतली. पण श्रीकांत त्याला मागे टाकत 13-11 असा पुढे गेला. मात्र सॉन हो ने गेम हातचा जाऊ न देण्याचा निर्धार करीत श्रीकांतला मागे टाकून हा गेम जिंकत बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये श्रीकांतने जोरदार सुरुवात करीत 4-0 अशी आघाडी घेतली. पण अनियंत्रित चुकांमुळे सॉन होने त्याला 4-6 असे मागे टाकले. आक्रमक व अचूक परतीचे फटके मारत श्रीकांतने वेगवान खेळाच्या बळावर बेकला 11-7 अशी मजल मारली. ब्रेकनंतरही श्रीकांतने आक्रमक फटक्यांची मालिका कायम राखत ही आघाडी 16-10 अशी केली. त्याला आठ मॅचपॉईंटही मिळाले सॉनने नेटला परतीचा फटका मारल्यानंतर श्रीकांतने जल्लोष सुरू केला.