वृत्तसंस्था/ लखनौ
भारताच्या पीव्ही सिंधूने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत आपल्याच देशाच्या तान्या हेमंतचा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
गेल्या आठवडय़ात झालेल्या इंडिया ओपन स्पर्धेत सिंधूला उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. येथील सामन्यात तिने तान्यावर 21-9, 21-9 अशी सहज मात केली. तिची पुढील लढत अमेरिकेच्या लॉरेन लामशी होणार आहे. लॉरेनने इरा शर्माचा 15-21, 21-16, 21-16 असा पराभव केला. महिलांच्या अन्य सामन्यात सामिया इमाद फारूकीने श्रुती मुंदडाचे कडवे आव्हान 17-21, 21-11, 21-10 असे संपुष्टात आणले तर सई उत्तेजिता राव चुक्काने अंजना कुमारीवर 21-9, 21-12 अशी मात केली. कनिका कंवलशी तिची पुढील लढत होईल. कनिकाने अमेरिकेच्या दिशा गुप्ताला 21-15, 16-21, 21-6 असे हरविले. सईची पुढील लढत आकर्षी कश्यपशी होईल. याशिवाय प्रेरणा नीलुरी, स्मित तोश्निवाल, अनुपमा उपाध्याय, कृती भारद्वाज यांनीही दुसरी फेरी गाठली आहे.
पुरुष विभागात कौशल धरमामर, चिराग सेन, मिथुन मंजुनाथ, रघू मरिस्वामी यांनी विजयी सुरुवात केली. कौशलने सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहला 14-21, 21-11, 21-16 असा पराभवाचा धक्का दिला. लक्ष्य सेनचा मोठा भाऊ चिरागने अन्सल यादववर 21-9, 21-6 असा सहज विजय मिळविला. मिथुनने आलाप मिश्राचा तर रघूने सिरिल वर्माचा पराभव केला. महिला दुहेरीत त्रीशा जॉली व गायत्री गोपीचंद यांनी महेक नायक व सौम्या सिंग यांचा 21-14, 21-4 असा पराभव केला. महिला एकेरीत सुपनंदा केटथाँग, रशियाची एवगेनिया कोसेत्स्काया यांनीही दुसरी फेरी गाठली आहे.