इंडोनेशिया मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धा : लक्ष्य सेनचे आव्हान मात्र संपुष्टात
वृत्तसंस्था /बाली (इंडोनेशिया)
भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू, सलग दोनवेळा ऑलिम्पिक पदक विजेती आणि विद्यमान विश्वविजेती पीव्ही सिंधूने महिला एकेरीत त्याचप्रमाणे किदांबी श्रीकांतने पुरूष एकेरीत इंडोनेशिया मास्टर्स सुपर 750 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.
गुरूवारी येथे झालेल्या महिला एकेरीच्या सामन्यात तृतीय मानांकित पी.व्ही. सिंधूने स्पेनच्या 47 व्या मानांकित क्लेरा अझुरमेंडीचा 17-21, 21-7, 21-12 अशा गेम्स्मध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. सिंधूचा क्लेराविरुद्ध हा पहिलाच सामना होता. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूची लढत तुर्कीच्या बेगर मानांकित नेसलिव्हान इजिटविरुद्ध होणार आहे.
पुरूष एकेरीच्या दुसऱया फेरीतील सामन्यात भारताच्या किदांबी श्रीकांतने इंडोनेशियाच्या जोनाटेन ख्रिस्तीवर 13-21, 21-18, 21-15 अशी मात करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. मात्र, भारताच्या लक्ष्य सेनचे आव्हान दुसऱया फेरीतच जपानच्या केंटो मोमोटाने 21-13, 21-19 अशा फरकाने संपुष्टात आणले. मिश्र दुहेरीच्या दुसऱया फेरीतील सामन्यात सुपेक जोमकोह आणि सुपीसेरा पी. या जोडीने भारताच्या धुव कपिला आणि एन सिक्की रेड्डी यांचा 21-15, 21-23, 21-18 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.