मिश्र दुहेरीत साई-रेड्डीचे आव्हान मात्र संपुष्टात
मुल्हेईम-जर्मनी / वृत्तसंस्था
दुहेरी ऑलिम्पिक पदकजेती पीव्ही सिंधू व वर्ल्ड चॅम्पियनशिप रौप्यजेता किदाम्बी श्रीकांत यांनी 1 लाख 80 हजार डॉलर्स बक्षीस रकमेच्या जर्मन ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत दुसरी फेरी गाठली. सातव्या मानांकित सिंधूने थायलंडच्या बुसाननचा 21-8, 21-7 अशा एकतर्फी फरकाने फडशा पाडला तर आठव्या मानांकित श्रीकांतने फ्रान्सच्या जागतिक क्रमवारीतील 39 व्या मानांकित ब्राईस लेव्हरडेझला 21-10, 13-21, 21-7 अशा फरकाने मात दिली. ही लढत 48 मिनिटात निकाली झाली.
जागतिक क्रमवारीत 11 व्या स्थानी असलेल्या बुसाननविरुद्ध सिंधूचा हा 15 वा विजय ठरला. श्रीकांतने देखील लेव्हरडेझविरुद्ध आपले रेकॉर्ड 4-0 असे आणखी भक्कम केले.
2019 मधील वर्ल्ड चॅम्पियन सिंधूची पुढील लढत स्पेनच्या बेट्रिझ कोरालेस किंवा चीनच्या झँग यि मॅनविरुद्ध होऊ शकते. याचवेळी 11 व्या मानांकित श्रीकांतसमोर दुसऱया फेरीत चीनच्या लू ग्वांग झूचे आव्हान असेल. जागतिक क्रमवारीतील 27 व्या मानांकित झूविरुद्ध झालेल्या दोन्ही लढतीत श्रीकांतने बाजी मारली असून ही घोडदौड येथेही कायम राखण्याचा त्याचा प्रयत्न असेल. श्रीकांतला यापूर्वी जानेवारीत संपन्न झालेल्या इंडिया ओपन सुपर 500 इव्हेंटमधून कोरोनाची बाधा झाल्याने माघार घ्यावी लागली होती.
मिश्र दुहेरीत साई प्रतिक के व एन. सिक्की रेड्डी यांना थायलंडच्या अव्वलमानांकित डेचॅपोल व सॅप्सिरीविरुद्ध 19-21, 8-21 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. महिला एकेरीत सिंधूने बुसाननविरुद्ध अवघ्या 32 मिनिटात विजय संपादन केला. सिंधूचे या लढतीवर पूर्ण वर्चस्व होते. तिने प्रारंभी पाहता पाहता 11-4 अशी आघाडी घेतली आणि गेम सहज खिशात घातला. त्यानंतर दुसऱया गेममध्ये देखील यापेक्षा वेगळे चित्र नव्हते. एकवेळ 7-5 अशी किंचीत आघाडीवरुन तिने 21-7 अशी एकतर्फी बाजी मारली.
पुरुष एकेरीत श्रीकांत उत्तम बहरात दिसून आला. त्याने 6-6 अशा बरोबरीवरुन 19-8 अशी आघाडी भक्कम केली आणि पहिला गेम सहज जिंकला. लेव्हरडेझने दुसऱया गेममध्ये 21-13 असा विजय संपादन करत बरोबरी मिळवली. मात्र, निर्णायक तिसऱया गेममध्ये पुन्हा एकदा श्रीकांत मुसंडी मारण्यात यशस्वी ठरला. त्याने 21-7 अशा फरकाने गेम व सामना जिंकत आगेकूच केली.