अपेक्षेप्रमाणे एकमताने निवडीवर शिक्कामोर्तब, 3 वर्षांचा कालावधी
लाहोर / वृत्तसंस्था
पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या (पीसीबी) अध्यक्षपदी माजी कर्णधार रमीझ राजा यांची एकमताने निवड करण्यात आली. रमीझ राजांकडे तीन वर्षे अध्यक्षपदाचा कार्यभार असणार आहे. मागील महिन्यात एहसान मणी यांनी राजीनामा दिल्यानंतर सदर पद रिक्त झाले होते.
रमीझ राजा यांच्यासाठी पीसीबीत कार्यरत राहण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2003 ते 2004 या कालावधीत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पद सांभाळले होते. नव्या अध्यक्ष निवडीसाठी सोमवारी नॅशनल हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये पीसीबी इलेक्शन कमिशनर, निवृत्त न्या. शेख अझमत सईद यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले गेले. पंतप्रधान इम्रान खान यांनी रमीझ राजा यांच्या निवडीची शिफारस केली आणि त्यावर शिक्कामोर्तब झाले.
‘मी इतरांवर जबाबदारी ढकलणारा अध्यक्ष अजिबात नसेन. प्रत्येक परिस्थितीचा स्वतः सामना करण्याची माझी तयारी आहे. क्रिकेट आणि ब्रॉडकास्टिंग या दोन्ही आघाडय़ांवर मी एकदाही बॅकफूटवर नसेन. कारण, या दोन्हीत मला तितकाच तोलामोलाचा अनुभव आहे’, असे रमीझ राजा अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना म्हणाले.
59 वर्षीय समालोचक रमीझ राजाचा 1992 मधील विश्वचषक जेत्या पाकिस्तान संघात समावेश होता. पीसीबी अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे ते अब्दुल हाफीज करदार (1972-1977), जावेद बुर्की (1994-1995) व इजाज बट (2008-2011) यांच्यानंतर चौथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरले आहेत. रमीझ राजा यांनी 1984 ते 1997 या कालावधीत पाकिस्तानतर्फे 250 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यात 8674 धावांचे योगदान दिले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला गतवैभव मिळवून देणे, हे आपले पहिले लक्ष्य असेल, असे त्यांनी याप्रसंगी म्हटले आहे.
कोट्स
भारताविरुद्ध द्विदेशीय मालिका होणे सध्याच्या घडीला तरी अजिबात शक्य नाही. पण, आम्हाला या निकषावर अजिबात घाई नाही. सध्या देशांतर्गत क्रिकेटवर आम्ही सर्वाधिक लक्ष केंद्रित करणार आहोत.
-पीसीबीचे नूतन अध्यक्ष रमीझ राजा
टी-20 वर्ल्डकपसाठी हेडन, फिलँडर पाकिस्तानचे प्रशिक्षक
युएईमध्ये होणाऱया आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीवीर मॅथ्यू हेडन व दक्षिण आफ्रिकेचा माजी जलद गोलंदाज व्हरनॉन फिलँडर हे पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक असतील, अशी घोषणा पीसीबीने सोमवारी केली. रमीझ राजा यांनी पीसीबी अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर काही तासातच या निवडीची घोषणा केली. आठवडाभरापूर्वी मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक व गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
‘माझ्या मते पाकिस्तानी संघाला नव्या मार्गदर्शकांची गरज आहे. या दृष्टिकोनातून आम्ही हेडन व फिलँडर यांची नियुक्ती केली’, असे रमीझ राजा पत्रकार परिषदेत म्हणाले. पाकिस्तान संघाने यापूर्वीही रिचर्ड पायबस, बॉब वूल्मर, जिऑफ लॉसन, डेव्ह व्हॉटमोर व मिकी ऑर्थर यांच्यासारखे काही विदेशी प्रशिक्षक नेमले होते.