तीन दिवसांच्या दौऱयात : गट समितींशी करणार चर्चा : युतीबाबतही चर्चा होण्याची शक्यता
प्रतिनिधी / पणजी
काँग्रेसचे गोवा निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम आणि गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव हे आज दि. 12 नोव्हेंबरपासून तीन दिवसांच्या गोवा दौऱयावर येत असून ते काँग्रेसच्या गटांशी बैठका घेऊन रणनीतीची तयारी करणार आहेत.
आज दि. 12 रोजी ते कळंगूट व पणजीच्या काँग्रेस गट समित्यांशी चर्चा करणार असून 13 नोव्हेंबर रोजी दाबोळी-नुवे मतदारसंघाच्या गट समित्यांशी बैठक घेणार आहेत. 14 नोव्हेंबर रोजी ते फोंडा व डिचोली गट समितीशी चर्चा करून सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत.
विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत अहे तसतशी या दोघांचे गोव्यात येणे जाणे वाढत आहे. दोन्ही नेते राज्यातील निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना एकत्र करीत असून गाठीभेटी वाढवत आहेत. संबंधित मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार कोण असावा यावरही चर्चा करण्यात येणार असून त्यावर एकमत साधण्याचा प्रयत्न चालू आहे. काही मतदारसंघात एकापेक्षा जास्त इच्छुक उमेदवार असल्यामुळे वाद सुरू झाले असून तेथे तोडगा काढण्यासाठी त्या दोघांची धडपड सुरु आहे. गोवा प्रदेश काँग्रेस समितीची बैठकही ते घेणार असून युतीबाबतही चर्चा होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.