पक्ष कार्यकर्त्यांकडे साधणार संवाद
प्रतिनिधी /मडगाव
काँग्रेस पक्षाचे गोवा निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम आणि गोवा प्रभारी दिनेश गुडूरांव हे आज शुक्रवारी पुन्हा गोवा भेटीवर येत आहे. त्यांची गोवा भेट तीन दिवसांची असून या भेटीत ते पक्षाच्या नेत्यांकडे तसेच प्रमुख कार्यकर्त्यांकडे आणि गट काँग्रेसच्या पदाधिकऱयांकडे संवाद साधणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पी. चिदंबरम आणि दिनेश गुंडूराव हे आज गोव्यात पोचल्यानंतर प्रथम पक्षाच्या अंतर्गत बैठका होणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी सालीगाव गटाकडे त्यांची चर्चा होणार आहे. शनिवार दि. 4 रोजी सकाळी 10.30 वा. पणजीत काँग्रेस हाऊसमध्ये नव्याने निवडणुकीसाठी समिती जाहीर केलेली आहे. त्या समितीचे प्रमुख व उपप्रमुख यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेस पक्षाची पुढील वाटचाल तसेच धोरण यावर भर दिला जाणार आहे. या बैठकीनंतर नव्याने ज्या गठ समित्या स्थापन करण्यात आलेल्या त्यांच्याबरोबर चर्चा होईल. त्यात निवडणुकीत गट समित्यांची भूमिका काय असेल यावर भर दिला जाणार जाणार आहे. 4 रोजी सायंकाळी 6 वा. मडगाव दैवज्ञ सभागृहात मडगाव गट काँग्रेस समितीबरोबर बैठक होणार आहे.
रविवार दि. 5 रोजी सकाळी 10 वा. गोव्यात होणाऱया अखिल भारतीय युवा काँग्रेसच्या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेचे आयोजन पणजीत केले जाणार असून त्यात राष्ट्रीय पदाधिकारी तसेच इतर राज्यांतील युवा काँग्रेसचे अध्यक्ष सहभागी होतील. राष्ट्रीय पातळीवरील विषय या परिषदेत चर्चेला येणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर सकाळी 11.15 वा. सांतआंद्रे मतदारसंघाच्या गट समितीकडे बैठक होईल. त्यानंतर कुठ्ठाळी गट समितीकडे कुठ्ठाळी येथे बैठक घेतली जाणार आहे. या नियोजित कार्यक्रमाबरोबरच पक्षाच्या विविध पदाधिकाऱयांबरोबर पी. चिदंबरम व दिनेश गुंडूराव हे चर्चा करणार आहेत.
40 ही मतदारसंघात पक्षाचे संभाव्य उमेदवार
काँग्रेस पक्षाने उमेदवार नक्की केले नसले तरी 40 ही मतदारसंघात पक्षाचे संभाव्य उमेदवार कोण असतील याची मोर्चे बांधणी करण्यात आल्याची माहिती यावेळी गिरीश चोडणकर यांनी दिली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सहा महिन्याचा कालावधी असतानाच पक्षाने निवडणुकीची तयारी सुरू केल्याने पक्ष कार्यकर्त्यांसाठी ते सोयीस्कर होईल. निवडणुकीसाठी पक्षाने निरीक्षक नियुक्त केलेला आहे तो सहा महिन्यापूर्वी करून एक चांगला पायंडा घातल्याचे यावेळी सांगण्यात आले.
इतर पक्षांपेक्षा जनतेकडे युती करण्याची तयारी
इतर पक्षांकडे युती करण्यापेक्षा जनतेकडे युती करण्याची काँग्रेस पक्षाची तयारी आहे. आज गोव्यातील जनता भाजल सरकारला कंटाळली असून त्यांना सत्तेवरून हटविण्यासाठी सर्वांनी काँग्रेस पक्षात यावे असे आवाहन श्री. चोडणकर यांनी केले. सद्या अनेक जण काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असून पक्ष मजबूत होत असल्याचा दावा त्यांनी केला.
चर्चिलने मुख्यमंत्र्यांना दिलेला पाठिंबा मागे घेतला का ?
चर्चिल आलेमाव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार व सोनिया गांधीकडे चर्चा करून गोव्यात युती व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विधान केले आहे. त्यावर आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना श्री. चोडणकर म्हणाले की, चर्चिल आलेमाव यांनी उघडरित्या भाजपचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पाठिंबा दिला होता. हा पाठिंबा त्यांनी मागे घेतला की नाही याची आपल्याला कल्पना नाही. एका बाजूने मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देणे व दुसऱया बाजूने युतीची भाषा बोलणे कितपत योग्य आहे. या पत्रकार परिषदेला एम. के. शेख. ज्यो डायस, डॉ. आशिष कामत व इतर मान्यवर उपस्थितीत होते.