बसवकल्याणमधील सभेत काँग्रेसमध्ये केला प्रवेश
प्रतिनिधी / बेंगळूर
पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिदर जिल्हय़ातील बसवकल्याण येथे मंगळवारी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जाहीर सभेत निजद वरिष्ठ नेते पी. जी. आर. सिंधिया यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी पक्षाचा ध्वज देऊन सिंधिया यांचे स्वागत केले.
मागील विधानसभा निवडणुकीवेळी पी. जी. आर. सिंधिया यांनी निजदच्या तिकीटावर बसवकल्याणमधून निवडणूक लढविली होती. त्यावेळी ते पराभूत झाले होते. काँग्रेसतर्फे बसवकल्याणमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मल्लम्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर निजदने सय्यद यस्रबअली काद्री यांना तिकीट दिले आहे. पक्षाने तिकीट न दिल्याने सिंधिया नाराज होते. त्यामुळे त्यांनी मंगळवारी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जाहीर सभेत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, आपण आणि सिंधिया जनता दलामध्ये (आताचा निजद) एकत्र होतो. त्याचवेळी आपल्याबरोबर त्यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करावयाचा होता. मात्र, उशिरा का होईना, ते काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. याप्रसंगी केपीसीसीचे कार्याध्यक्ष ईश्वर खंड्रे, सलीम अहमद, महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील आदी उपस्थित होते.