वृत्तसंस्था / चेन्नई :
भारतीय ग्रँडमास्टर पी. हरिकृष्णने सेंट लुईस रॅपिड व ब्लिट्झ ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत वर्ल्ड चॅम्पियन नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनला पराभवाचा धक्का दिला. पण नंतर 4 सामने गमविल्याने त्याची संयुक्त सहाव्या स्थानावर घसरण झाली.
ब्लिट्झ 1 विभागातील तिसऱया फेरीत हरिकृष्णने पांढऱया मोहरांनी खेळताना जागतिक अग्रमानांकित कार्लसनवर 63 व्या चालीत मात केली. त्याने नंतर अमेरिकेच्या जेफ्री जिआँगवरही विजय मिळविला. पण त्यानंतर चार डावात त्याला पराभव स्वीकारावा लागला आणि तीन डाव त्याने अनिर्णीत राखले. अमेरिकेचे लीनियर डॉमिनिगेझ, वेस्ली सो, रशियाचा अलेक्झांडर ग्रिस्चुक, इराणचा नवा तारा अलिरेझा फिरौजा यांच्याकडून तो पराभूत झाला. हरिकृष्ण 9 फेऱयानंतर 3.5 गुणांसह अर्मेनियाच्या लेव्हॉन ऍरोनियनसमवेत संयुक्त सहावे स्थान मिळविले आहे. रॅपिडची स्पर्धा झाल्यानंतर कार्लसन वेस्ली सोनंतर दुसऱया स्थानावर राहिला होता. पण आता त्याने दोन्ही विभागात मिळून 18.5 गुणांसह अग्रस्थान पटकावले आहे. ब्लिट्झ 1 मध्ये हरिकृष्ण व नेपोमनियाची यांच्याकडून पराभव झाला असला तरी त्याने 6.5 गुण मिळविले आहेत. ब्लिट्झ 2 ने या स्पर्धेची सांगता होणार आहे.
ब्लिट्झ विभागातील प्रत्येक विजयास 1, अनिर्णीत डावास अर्धा गुण दिला जातो तर रॅपिड डावात विजयी खेळाडूस 2, अनिर्णीत डावास 1 गुण दिला जातो. या स्पर्धेत एकूण 10 खेळाडूंचा सहभाग असून 2.5 लाख डॉलर्सचे एकूण बक्षीस आहे. रॅपिडमध्ये 9 व ब्लिट्झमध्ये 18 डाव होणार आहेत.
ब्लिट्झ 1 नंतरची क्रमवारी : 1) कार्लसन 18.5 गुण, 2) वेस्ली सो 18 गुण, 3) नेपोमनियाची 15 गुण, 4) हिकारु नाकामुरा, ग्रिस्चुक प्रत्येकी 14.5 गुण, 6), पी.हरिकृष्ण, ऍरोनियन प्रत्येकी 12.5 गुण, 8) जेफ्री जिआँग 11.5 गुण, 9) डॉमिनिगेझ 9.5 गुण, 10) अलिरेझा फिरौजा 8.5 गुण.