दिघंची/वार्ताहर
दिघंची जवळ असणाऱ्या पुजारवाडी (दि) येथील टिंगरे वस्ती, पुजारीमळा येथे बिबट्या सदृश प्राणी आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास येथील अमोल पुजारी या युवकाला बिबट्या सुदृश प्राणी दिसून आला. हा प्राणी त्याने १०० फूट अंतरावरून पाहिल्याचे सांगितले.
सदर घटनेची माहिती मिळताच आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी नागरिकांनी अंगणात अथवा बाहेर न झोपण्याचे आवाहन केले. तसेच नागरिकांनी वनविभागाला सदरची माहिती कळवली परंतु वन विभागाचे कर्मचारी उशिरा आले. बिबट्या सदृश प्राणी आल्याचे कळताच परिसरतील नागरिकांनी गर्दी केली. सदर घटनेची माहिती मिळताच पुजारवाडीचे सरपंच ब्रह्मदेव होनमाणे,कुष्णदेव मोरे, प्रणव गुरव आदींनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता काळजी घेण्याचे आवाहन केले.