नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराचे त्याच्या कुटुंबीयांसमवेत काही छायाचित्रे आपल्या साईटवर प्रसिद्ध केली असून, ‘पुजारासारखे सर्वांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत घरीच रहा आणि सुरक्षित रहा,’ असा संदेश त्यांनी त्याखाली दिला आहे.
पुजाराने याआधी विलगीकरणातील आयुष्याबद्दल आपले अनुभव सांगितले आहेत. ‘माझ्यासाठी हा स्वागतार्ह बदल होता,’ असे त्याने सांगितले होते. ‘मला स्वतःसाठी वेळ घालविणे आवडते. जेव्हा मी घरी एकटा असतो तेव्हा पुस्तक वाचणे, टीव्ही पाहणे यात तो वेळ घालवतो. माझी छोटी मुलगी फार धडपडी असून सतत खेळणे तिला आवडते. त्यामुळे माझा अर्धा दिवस तिच्यासमवेत खेळण्यात, तिच्याकडे लक्ष देण्यातच जातो. याशिवाय पत्नी पूजाला घरकामातही मी मदत करीत आहे,’ असेही त्याने सांगितले आहे.
भारताने अलीकडेच न्यूझीलंड दौरा केला त्यात पुजाराही सहभागी होता. त्यानंतर या मोसमात रणजी करंडक पटकावलेल्या सौराष्ट्र संघातूनही अंतिम सामन्यात भाग घेतला होता. नजीकच्या काळात भारताची कसोटी मालिका नसल्याने तसेच आयपीएलमध्ये त्याला कोणीही खरेदी केले नसल्याने त्याने इंग्लंडमधील ग्लुसेस्टरशायर कौंटीशी सहा सामन्यांचा करार केला आहे. मात्र कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे कौंटी सामने होण्याबाबतही साशंकता व्यक्त करण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रकोपामुळे जगातील सर्वच क्रीडा प्रकारांना सध्या ‘थांबावे’ लागले आहे.