राजकोट / वृत्तसंस्था
चेतेश्वर पुजारा व अर्पित वासवदा यांनी मास्टरक्लास फलंदाजी साकारत सहाव्या गडय़ासाठी 380 चेंडूत 142 धावांची मॅरेथॉन भागीदारी केल्यानंतर सौराष्ट्राने येथील रणजी अंतिम लढतीच्या दुसऱया दिवशी 8 बाद 384 धावांपर्यंत मजल मारली. पुजाराने 237 चेंडूत 5 चौकारांसह 66 तर अर्पित वासवदाने 287 चेंडूत 11 चौकारांसह 106 धावांचे योगदान दिले. दिवसअखेरीस चिराग जानी 44 चेंडूत 13 तर धर्मेंद्रसिंह जडेजा 22 चेंडूत 13 धावांवर खेळत होते.
मंगळवारी दुसऱया दिवसाच्या खेळात यजमान संघाने 79.1 षटकात 3 गडय़ांच्या बदल्यात 178 धावा जमवल्या. स्पीडस्टार मुकेश कुमारने पुजारा व प्रेरक मंकड यांना शेवटच्या सत्रात बाद केले. पण, तोवर बंगालला सौराष्ट्राने बरेच धक्के देऊन झाले होते. बंगालला दिवसातील पहिला बळी घेण्यासाठी चहापानानंतर पाचव्या षटकापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. वृद्धिमान साहाने शाहबाज नदीमच्या गोलंदाजीवर वासवदाला यष्टीचीत करत यश मिळवून दिले.
बंगालची खराब खेळपट्टीची तक्रार
बंगालचे प्रशिक्षक अरुण लाल यांनी येथील खेळपट्टी अतिशय खराब दर्जाची असल्याची तक्रार येथे नोंदवली. अनेक चेंडू टप्पा पडल्यानंतर बरेच खाली रहात होते, यावर त्यांचा आक्षेप होता. पुजारा व वासवदा यांनी फटकेबाजीवर अजिबात भर दिला नाही. त्यामुळे त्यांची भागीदारी लक्षवेधी अशी नव्हती. पण, परिणामकारक नक्कीच होती.
एकीकडे, पुजाराने आपल्या टीपिकल शैलीत संयमी, धीरोदात्त खेळी साकारली तर दुसरीकडे, वासवदाने देखील संयम व एकाग्रतेचा उत्तम मिलाफ दाखवून दिला. त्याच्या खेळीत 11 चौकारांचा समावेश राहिला. वासवदाचे हे प्रथमश्रेणीतील आठवे शतक आहे. आश्चर्य म्हणजे चेतेश्वर पुजाराचे वडील अरविंद पुजारा हेच वासवदाला प्रशिक्षण देत आले आहेत.
वासवदाचे हंगामातील चौथे शतक
वासवदाने या हंगामात लागोपाठ शतके झळकावली असून हे शतक त्याच्यासाठी हंगामातील चौथे ठरले. यापूर्वी, उपांत्य लढतीत गुजरातविरुद्ध विजय मिळवून देताना देखील वासवदानेच निर्णायक खेळी साकारली होती. पुजारा व वासवदा या जोडीने मंगळवारी सामन्याच्या दुसऱया दिवशी इतक्या बचावात्मक पवित्र्यावर भर दिला की, त्यांना दिवसातील पहिल्या चौकारासाठी देखील चक्क 15 व्या षटकापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. वासवदाने या षटकात आकाश दीपला पूलचा फटका लगावला आणि सौराष्ट्रासाठी दिवसातील साधारणपणे तासाभराच्या खेळानंतर पहिला चौकार नोंदवला गेला.
पहिल्या दिवशी 80.5 षटके टाकलेल्या बंगालने दुसऱया दिवशी 85 व्या षटकात नवा चेंडू घेतला. पण, ही चाल ब्रेकथ्रू मिळवण्यासाठी मात्र अजिबात फलद्रूप झाली नाही. वासवदाने ऑफस्पिनर अर्णब नंदीला मिडऑनच्या दिशेने ड्राईव्ह करत चौकार मिळवला आणि इथेच अर्धशतक साजरे केले. त्यानंतर कसोटी स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजारा पायचीतच्या जोरदार अपीलमधून बचावला. बंगालने यावेळी डीआरएस घेतला होता.
चहापानाच्या उंबरठय़ावर शतक
दुपारच्या सत्रात वासवदाने स्ट्रेट ड्राईव्ह लगावल्यानंतर गोलंदाज मुकेशच्या हाताला लागून चेंडू यष्टीवर आदळला, त्यावेळी पुजारा नॉन स्ट्रायकर एण्डवर होता. बंगालने जोरदार अपीलही केले. पण, हे अपील फेटाळले गेले. वासवदाने चहापानाला 20 मिनिटांचा खेळ बाकी असताना शतकाला गवसणी घातली. पुजारानेही आलिंगन देत त्याचे अभिनंदन केले. पुजाराने पुढे चहापानाच्या उंबरठय़ावर 191 चेंडूत 5 चौकारांसह अर्धशतक नोंदवले. सौराष्ट्राने पहिल्या दोन सत्रात 58.1 षटकात 133 धावा वसूल केल्या. आकाश दीपला कव्हर व पॉईंटच्या मधून फटकावले, तो पुजारासाठी दिवसातील सर्वोत्तम फटका ठरला.
पहिल्या दिवशी अर्धशतक झळकावणाऱया सौराष्ट्राचा फलंदाज विश्वराज जडेजाने दुसऱया दिवशी 100 ते 150 धावा केल्या तरी ते पुरेसे ठरेल, असे म्हटले होते. सौराष्ट्राने दिवसभरात 178 धावा झळकावत त्यापेक्षा सरस कामगिरी केली.
धावफलक
सौराष्ट्र पहिला डाव : हार्विक देसाई झे. बदली खेळाडू (ए. रमण), गो. शाहबाज नदीम 38 (111 चेंडूत 5 चौकार), अवी बारोट झे. साहा, गो. आकाश दीप 54 (142 चेंडूत 6 चौकार), विश्वराज जडेजा त्रि. गो. आकाश दीप 54 (92 चेंडूत 7 चौकार), अर्पित वासवदा यष्टीचीत साहा, गो. शाहबाज 106 (287 चेंडूत 11 चौकार), शेल्डॉन जॅक्सन पायचीत गो. पोरेल 14 (15 चेंडूत 3 चौकार), चेतेश्वर पुजारा पायचीत गो. मुकेश कुमार 66 (237 चेंडूत 5 चौकार), चेतन साकरिया झे. साहा, गो. आकाश दीप 4 (8 चेंडूत 1 चौकार), चिराग जानी खेळत आहे 13 (44 चेंडूत 1 चौकार), प्रेरक मंकड पायचीत गो. मुकेश कुमार 0 (4 चेंडू), धर्मेंद्रसिंह जडेजा खेळत आहे 13 (22 चेंडूत 3 चौकार). अवांतर 22. एकूण 160 षटकात 8 बाद 384.
गडी बाद होण्याचा क्रम
1-82 (हार्विक, 37.5), 2-113 (अवी बरोत, 48.1), 3-163 (विश्वराज जडेजा, 65.3), 4-182 (शेल्डॉन जॅक्सन, 68.6), 5-206 (साकरिया, 80.5), 6-348 (वासवदा, 143.6), 7-358 (पुजारा, 150.3), 8-364 (प्रेरक मंकड, 152.1).
गोलंदाजी
इशान पोरेल 26-10-51-1, मुकेश कुमार 38-8-83-2, शाहबाज नदीम 46-14–103-2, आकाश दीप 30-8-77-3, अर्णब नंदी 17-3-45-0, अनुस्टुप मजूमदार 3-0-12-0.
मैदानी पंच सी. शमसुद्दीन जखमी, यशवंत बर्डेना पाचारण
या सामन्यात पहिल्या दिवसाच्या खेळादरम्यान मैदानी पंच सी. शमशुद्दीन यांना चेंडू लागल्याने ते उर्वरित सामन्यात पंच म्हणून काम पाहू शकणार नाही, हे मंगळवारी दुसऱया दिवशी स्पष्ट झाले आणि यामुळे यशवंत बर्डे यांना पर्यायी पंच म्हणून तातडीने पाचारण केले गेले. यापूर्वी, सोमवारी पहिल्या दिवशी शमशुद्दीन यांच्यावर चेंडू आदळल्यानंतर त्यांना मैदानाबाहेर जावे लागले, त्यावेळी अनंत पद्मनाभन यांनीच पंच म्हणून काम पाहिले व स्थानिक पंच पियूष खाकर स्क्वेअर लेगला थांबले होते.
उपाहारानंतर पर्यायी पंच एस. रवी दाखल झाले आणि त्यांनी पद्मनाभन यांच्यासह पंचगिरी केली. शमशुद्दीन यांनी यादरम्यान टीव्ही पंच म्हणून काम पाहिले. आता बुधवारी तिसऱया दिवसाच्या खेळात यशवंत बर्डे व पद्मनाभन मैदानी पंच म्हणून काम पाहणार आहेत. शमशुद्दीन यांना प्राथमिक चाचणीनंतर एक आठवडा विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असल्याचे सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्थेला कळवले.