पुड्डुचेरी विधानसभा निवडणुकीच्या 30 जागंवर एकूण 323 उमेदवार आहेत. काँग्रेस द्रमुकसोबत आघाडी करून पुन्हा एकदा पुड्डुचेरीची सत्ता प्राप्त करू पाहत आहे. तरभाजपने अखिल भारतीय एनआर काँग्रेस आणि अण्णाद्रमुकसोबत अन्य छोटय़ा पक्षांशी आघाडी केली आहे.
एन. रंगासामी यांच्या नेतृत्वाखालील एआयएनआरसी 16 जागांवर निवडणूक लढवत आहे. तर उर्वरित 14 जागांवर भाजपचे 9 तर अण्णाद्रमुकचे 5 उमेदवार उभे आहेत. अशाचप्रकारे काँग्रेस 14 जागांवर निवडणूक लढवत आहेत. यानम मतदारसंघात पक्षाने अपक्षाला पाठिंबा दिला आहे. तर द्रमुकसह अन्य सहकारी पक्ष 13 जागांवर निवडणूक लढवत आहेत. कमल हासन यांच्या पक्षाचेही उमेदवार उभे राहिले आहेत.
मागील निवडणुकीत काँग्रेसने 15 जागांवर यश मिळविले होते. तर द्रमुकने 3 ठिकाणी विजय मिळविला होता. व्ही. नारायणसामी मुख्यमंत्री झाले होते. पण यंदाच्या निवडणुकीपूर्वी त्यांचे सरकार कोसळले होते. अशा स्थितीत काँग्रेससमोर पुन्हा एकदा सत्तेवर परतण्याचे आव्हान आहे.
येथील यानम मतदारसंघ हायप्रोफाइल मानला जात आहे. एआयएनआरी नेते एन. रंगासामी येथून निवडणूक लढवत अआहेत. याचबरोबर ते पुड्डुचेरीच्या थातांचवडी येथूनही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ए.व्ही. सुब्रमण्यम कराईकल (उत्तर) मध्ये पक्षाचे उमेदवार आहेत. अण्णाद्रमुक नेते ए. अंबलगन हे उप्पलाम तर ओम सखी सेगर हे ओर्लीनपेट मतदारसंघात उभे राहिले आहेत. उप्पलाम मतदारसंघात 2011 पासून अंबालागन विजयी होत आहेत.
कामराज नगर मतदारसंघातून माजी मंत्री एम.ओ.एच.एफ. शाहजहां निवडणूक लढवत आहेत. एमबालम मतदारसंघात एम. कंदलसामी आणि तिरुनलार मतदारसंघातून आर. कमलाकनन मैदानात आहेत. मन्नादीपित मतदारसंघात माजी मंत्री ए. नमस्सिवयम भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. पुड्डुचेरी नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. पण यंदा भाजपला येथे विजयाची नामी संधी चालून आली आहे.