प्रतिनिधी/ बेळगाव
पुढील आठवडय़ात तुमची जर आर्थिक क्षेत्राशी निगडीत कामे असतील तर ती वेळेत पूर्ण करून घेणे जरूरीचे ठरणार आहे. कारण पुढील आठवडय़ात केवळ 3 दिवस बँका सुरू राहणार आहेत. सण, जयंती व निवडणूक असल्याने सुट्टय़ा असणार आहेत. यामुळे ग्राहकांना सोमवारी, गुरूवारी व शुक्रवारी कामे पूर्ण करून घ्यावी लागणार आहेत.
प्रत्येकाचा या ना त्या कारणाने बँकांशी संपर्क येत असतो. कोणतेही आर्थिक व्यवहार करायचे असल्यास त्यासाठी बँकांमध्ये जावेच लागते. परंतु पुढील आठवडय़ात सुट्टय़ा असल्याने ग्राहकांची गैरसोय होणार आहे. मंगळवारी गुढीपाडवा, बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तर शनिवारी बेळगाव लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूक असल्याने बँकांना सुट्टी असणार आहे. यामुळे आठवडय़ातील केवळ 3 दिवस बँका सुरू राहणार आहेत.
ग्राहकांना एटीएमचा आधार
गुढीपाडव्यानिमित्त मोठय़ा प्रमाणात उलाढात होते. या दिवशी वस्तूंची खरेदी तसेच गुंतवणूक मोठय़ा प्रमाणात केली जाते. यामुळे चलनाची आवश्यकता भासत असते. परंतु त्या दिवशी बँका बंद राहणार असल्याने ग्राहकांना एटीएमवर अवलंबून रहावे लागणार आहे. तसेच मोबाईल वॉलेटचाही पर्याय ग्राहकांसमोर असणार आहे.