प्रतिनिधी/ पणजी
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर पुढील आठवडय़ापासून सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. काल बुधवारी तिसवाडी तालुक्यासंदर्भातील बैठकही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी तिसवाडीचे सर्व आमदार उपस्थित होते.
कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी उपचार करण्यासाठी अफेरसीस मशीन उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी ऑर्डर देण्यात आली आहे. पुढील तीन दिवसात मशीन येणार आहे. त्याचबरोबर यावर काम करण्यासाठी विशेष तंत्रज्ञानाची गरज आहे. एमडी ट्रान्स्फ्युजनसाठी डॉक्टरची आवश्यकता आहे. त्यासाठी डॉक्टरची नियुक्ती करण्याची सूचना गोमेकॉ डीनना देण्यात आली आहे. ही नियुक्ती कंत्राटी पद्धतीवर होणार आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण करून सोमवार, मंगळवार पर्यंत उपचार सुरू केले जातील.
कोरोनामुक्तांकडून स्वच्छेने प्लाझ्मा घेणार
गोमेकॉतील रक्तपेढीच्या ठिकाणी हे अफेरसीस मशिन बसविण्यात येणार आहे. या मशिनमध्ये प्लाझ्माचे 2000 पॅक ठेवता येतील. या मशिनची क्षमता 4000 पॅक साठविण्याची आहे. जे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत व दोन आठवडय़ांचा कालावधी पूर्ण झाला आहे अशा व्यक्तींकडून स्वच्छेने प्लाझ्मा घेतला जाणार आहे. त्या व्यक्तीला त्यामुळे कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. या बैठकीला आरोग्यमंत्री विश्वजित राणे, राज्याचे मुख्यसचिव तसेच गोमेकॉचे डीन यांची उपस्थिती होती.
वाढदिवसाच्या पार्टीवरही बंदी
भाजप आमदार व कार्यकर्त्याच्या उपस्थितीत झालेल्या कळंगूट येथील पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र गोंधळ माजला होता. त्याच पार्श्वभूमीवर सरकारनेही पार्टीची दखल घेतली आहे. राज्यात सध्या वाढदिवसांसह सर्व पाटर्य़ांवर बंदी घातली आहे. लग्नासाठी 50 माणसांच्या उपस्थितीला मान्यता असेल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. घरात, बाहेर सर्व पाटर्य़ांवर बंदी घालण्यात आली. अशा पाटर्य़ाबाबत माहिती देण्याची सूचना आमदारांना केली आहे.
आमदार क्लाफास डायस यांची प्रकृती स्थिर
कोरोनाबाधित झालेले आमदार क्लाफास डायस यांची प्रकृती चांगली असून स्थिर आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. एम्स्मधील डॉक्टरशीही त्याबाबत सल्लामसलत केली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
तिसवाडीची आढावा बैठक
तिसवाडी तालुक्यातील पाचही मतदारसंघामध्ये कोरोनाची स्थिती काय आहे, याचा आढावा काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी सर्व आमदार उपस्थित होते. आमदारांच्या सहभागाने निर्णय घेतले जातील. उपजिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक, आरोग्य अधिकारी, मामलेदार यांच्याशी सल्लामसलत करून कंटेनमेंट झोन किंवा कोविड सेंटर स्थापनेबाबत निर्णय घेण्यात येणार आहेत. सर्वावर जबाबदारी दिली जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तिसवाडीतील पणजी मतदारसंघ कोरोनामुक्त
तिसवाडी तालुक्यातील पाच मतदारसंघापैकी पणजी हा एकमेव मतदारसंघ कोरोनामुक्त आहे. पणजी मतदारसंघात कोरोनाबाधित रुग्ण सापडलेले नाहीत. पणजी कोरोनामुक्त ठेवण्यासाठी सरकारी यंत्रणेने सतर्क रहायला हवे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. तिसवाडी तालुक्यातील कोविड 19 बाबत व्यावस्थापनासाठी बोलावलेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते.