दिवाळीनंतर अधिक माहिती शक्य – होंडा मोटारशी चर्चा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दुचाकी क्षेत्रातील कंपनी होंडा मोटारसायकल ऍण्ड स्कूटर्स इंडिया पुढील आर्थिक वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या स्पर्धेत प्रवेश करणार असल्याची माहिती अध्यक्ष, सीईओ अत्सुशी ओगाटा यांनी दिली. सरकार इलेक्ट्रिक वाहन निर्मितीसाठी प्रोत्साहन देत असल्याच्या पार्श्वभूमीवर होंडाने सदरचा निर्णय घेतला आहे.
पुढील आर्थिक वर्षात आपली पहिली इलेक्ट्रिक गाडी कंपनी सादर करेल. ऍक्टिव्हा व शाईन या दोन गाडय़ा कंपनीच्या लोकप्रिय ठरल्या आहेत. इलेक्ट्रिक दुचाकी जपानच्या होंडा मोटार कंपनीसोबत सविस्तर चर्चा केल्यानंतर विकसित केली जाणार असल्याची माहितीही पुढे आली आहे. पण याबाबत कंपनीने कोणतीही बाब स्पष्ट केलेली नाही.
पुढील आर्थिक वर्षापर्यंत नवी दुचाकी आणण्याचा कंपनीचा इरादा आहे. भारतात नव्या येऊ पाहणाऱया दुचाकीची चाचणीबाबत सांगण्यास कंपनीने नकार दिला. दिवाळीनंतरच सर्व काही मर्गी लागणार आहे. त्यानंतर अधिकृत माहिती दिली जाईल, असे अत्सुशी ओगाटा यांनी सांगितले.