विमाने नवीन वैमानिकी प्रणालींनी सुसज्ज असणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
स्वदेशी तेजस बहुउद्देशीय लढाऊ विमानाच्या नव्या आवृत्तीचे उत्पादन पुढील वर्षीपासून सुरू होणार असल्याचे हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडचे (एचएएल) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आर. माधवन यांनी जाहीर केले. या अत्याधुनिक आवृत्तीचे तेजस लढाऊ विमान अधिक शक्तिशाली इंजिन, अधिक शस्त्रास्त्र क्षमता, पुढच्या पिढीच्या इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालीसह बऱयाच नवीन वैमानिकी प्रणालींनी सुसज्ज असणार आहे. अपेक्षित वेळेनुसार निर्मिती सुरू झाल्यास 2023 मध्ये म्हणजे केवळ वर्षभरात त्याच्या सराव चाचण्याही सुरू होतील, अशी पुष्टीही माधवन यांनी जोडली आहे.
तेजस मार्क -2 या विमानाच्या अत्याधुनिक आवृत्तीवर काम यशस्वीपणे सुरू आहे. त्याचे उत्पादन 2025 च्या आसपास सुरू होण्याची अपेक्षा आहे. तेजस लढाऊ विमानाच्या अपग्रेड केलेल्या आवृत्तीत मोठी रचना, लांब पल्ल्याची क्षमता असेल. एवढेच नव्हे तर त्याच्या देखभाल-दुरुस्तीच्या समस्येची दखलही ‘एचएएल’कडून घेतली जाणार आहे. स्वदेशी नवीन तेजस विमाने अधिक शस्त्रप्रणाली स्वतःसोबत ठेवण्यास सक्षम असतील. तसेच त्यांची इंजिन क्षमता मजबूत आणि उत्कृष्ट असणार आहे. शत्रूशी लढा देताना अधिक प्रभावी ठरण्यासाठी या विमानांमध्ये लढाऊ प्रणाली अधिक सुसज्ज असणार आहे, अशी माहिती आर. माधवन यांनी दिली.
नवीन तेजस रेंजपैकी ‘तेजस मार्क-1’मध्ये सुसज्ज आणि अत्यंत वजनदार शस्त्रे बाळगण्याची क्षमता असणार आहे. तर तेजसची नवीन आवृत्ती, म्हणजे ‘तेजस मार्क-2’च्या पहिल्या विमानाला थोडाफार विलंब लागला तरी 2022 च्या ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत ते जगासमोर येऊ शकते, अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे. सध्या भारतीय वायुसेनेत 40 तेजस विमाने असून नवी विमाने या विमानांपेक्षा जास्त आधुनिक असतील, अशी माहिती देण्यात आली.
2023 मध्ये होणार हाय-स्पीड चाचणी
विमानाची पहिली हाय-स्पीड चाचणी 2023 मध्ये सुरू होण्याचे संकेतही मिळाले आहेत. तेजस हे बहुउद्देशीय सुपरसोनिक लढाऊ विमान आहे. हे एचएएलने तयार केले आहे. भारतीय वायु सेना 48 हजार कोटी रुपयांच्या कराराखाली ‘एचएएल’कडून 73 तेजस मार्क-1 खरेदी करीत आहे. सरकारने 13 जानेवारीला या करारास मान्यता दिली आहे. ‘तेजस मार्क-2’बाबत बोलताना गरज आणि बदलत्या परिस्थितीच्या आधारे या आवृत्तीमध्ये बदल करण्यात येणार असल्याचे माधवन यांनी स्पष्ट केले.
केंद सरकारचा ‘एचएएल’शी करार
73 आधुनिक तेजस युद्धविमाने (मार्क ए वन तेजस) खरेदी करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने संमती दिली आहे. हा करार केंद्र सरकार ‘एचएएल’ या कंपनीबरोबर होणार आहे. एका भारतीय कंपनीबरोबर केंद्र सरकारकडून करण्यात येणारा हा सर्वात मोठा संरक्षण सामग्री खरेदी करार ठरणार आहे. करारावर स्वाक्षऱया झाल्यानंतर तीन वर्षांनी विमानांचा पुरवठा सुरू होईल.
संरक्षण सामग्री स्वयंपूर्णता
संरक्षण सामग्रीच्या उत्पादनात भारताला जास्तीत जास्त स्वयंपूर्ण करण्याची सरकारची योजना आहे. या योजनेचा एक भाग म्हणून ही विमाने खरेदी केली जातील. आगामी काही वर्षांमध्ये तेजस हे हलके युद्ध विमान भारताच्या वायुदलाचा आधारस्तंभ बनणार असून त्यादृष्टीने पावले टाकली जात आहेत. हिंदुस्तान एरॉनॉटिक्स या कंपनीने तेजसची मोठय़ा प्रमाणात निर्मिती करण्यासाठी नाशिक आणि मुंबई येथे नवी उत्पादन केंद्रे सुरू केली आहेत.
अत्याधुनिक उपकरणs
नव्या तेजस विमानांवर अत्याधुनिक उपकरणे बसविण्यात येतील. त्यात एईएसए रडार, दीर्घ पल्ल्याची बीव्हीआर क्षेपणास्त्रे, शत्रूचे रडार आणि क्षेपणास्त्रे बंद पाडण्याची क्षमता असणारी उपकरणे इत्यादींचा समावेश असणार आहे.