वृत्तसंस्था / लंडन
2021 हंगामातील भारताविरुद्ध 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत चाहत्यांना प्रवेश देण्याचा प्रस्ताव इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाच्या विचाराधीन आहे. उभय संघात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सदर मालिका होणार आहे.
या वर्षारंभी, पाकिस्तानने इंग्लंडचा दौरा केला व विंडीज संघही तेथे कसोटी मालिका खेळला. पण, कोव्हिड-19 अस्मानी संकटाच्या पार्श्वभूमीवर, बंद स्टेडियममध्ये सदर मालिका संपन्न झाल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेसाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला होता.
‘यंदा काही खेळाडूंच्या दमदार प्रदर्शनाने हा मोसम गाजला आणि पुढील हंगामात प्रेक्षकांच्या साक्षीने आणखी अव्वल दर्जाचा खेळ साकारला जाईल, याची खात्री वाटते. प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येऊन सामन्यांचा आनंद लुटता यावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’ असे ईसीबी सीईओ टॉम हॅरिसन यांनी मंडळाने जारी केलेल्या पत्रकातून नमूद केले. ‘पुढील हंगामात अनेक महत्त्वाच्या मालिका होत आहेत आणि भारताविरुद्धची कसोटी मालिका यात केंद्रस्थानी असेल. त्यानंतर ऍशेस मालिका देखील तितकीच तोलामोलाची असणार आहे’, याचा त्यांनी पुढे उल्लेख केला.
भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी सामने अनुक्रमे ट्रेंट ब्रिज, लॉर्ड्स, हेडिंग्ले, ओव्हल व ओल्ड ट्रफोर्डवर होणार आहेत. यापूर्वी 2018 मध्ये शेवटचा इंग्लंड दौरा केला, त्यावेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला 1-4 असा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला होता. भारताविरुद्ध मालिकेपूर्वी श्रीलंकेचा संघ दि. 29 जून ते 4 जुलै या कालावधीत 3 वनडे खेळेल तर पाकिस्तानचा संघ दि. 8 ते 20 जुलै या कालावधीत 3 टी-20 व 3 वनडे खेळणार आहे.
भारताचा इंग्लंड दौरा
तारीख लढत ठिकाण
4 ते 8 ऑगस्ट पहिली कसोटी ट्रेंट ब्रिज
12 ते 16 ऑगस्ट दुसरी कसोटी लॉर्ड्स
25 ते 29 ऑगस्ट तिसरी कसोटी हेडिंग्ले
2 ते 6 सप्टेंबर चौथी कसोटी ओव्हल
10 ते 14 सप्टेंबर पाचवी कसोटी ओल्ड टॅफोर्ड.