वृत्तसंस्था/ बेंगळूर
आठव्या प्रो कबड्डी लिग हंगामातील गुरुवारी येथे खेळविण्यात आलेल्या 79 व्या सामन्यात पुणेरी पलटनने यूपी योद्धाचा 44-38 अशा गुणांनी पराभव केला. या सामन्यात पुणेरी पलटन संघातील मोहित गोयतने दर्जेदार कामगिरी केली. या विजयामुळे पुणेरी पलटन संघाने प्ले-ऑफच्या समीप झेप घेतली आहे.
गुरुवारच्या सामन्यात पुणेरी पलटन संघातील मोहित गोयतने 14 गुण नोंदविले. मोहितला अस्लम इनामदारची चांगली साथ लाभली. अस्लमने 3 टॅकल गुणांसह एकूण 12 गुण मिळविले. यूपी योद्धा संघातर्फे सुरिंदर गिलने 16 गुण घेतले. पुणेरी पलटन संघाने 8 व्या मिनिटाला यूपी योद्धा संघाचे सर्व गडी बाद करून 8 गुणांची आघाडी मिळविली होती. मध्यंतरापर्यंत पुणेरी पलटनने यूपी योद्धा संघावर 22-18 अशी आघाडी घेतली होती. सामन्याच्या उत्तरार्धातील सातव्या मिनिटाला मोहित गोयतने सुपर टेन गुण नोंदविताना यूपी योद्धा संघाचे सर्व गडी बाद केले. दरम्यान, यूपी योद्धा संघातील प्रदीप नरवालने चढाईचे 3 गुण मिळविल्याने पुणेरी पलटनची आघाडी थोडी कमी झाली. सामना संपण्यास दहा मिनिटे बाकी असताना पुणे संघाने 11 गुणांची बढत घेतली होती. यूपी योद्धा संघाचे तिसऱयांदा सर्व गडी बाद झाल्याने पुणेरी पलटनने हा सामना 6 गुणांच्या फरकाने जिंकून यूपी योद्धा संघाचे आव्हान संपुष्टात आणले.