बोरी पुलावरील घटना,चार तासांचा थरार
प्रतिनिधी / फोंडा
बोरी (जुवारी नदी) पुलावरील लोखंडी ग्रिलचे कुंपण भेदत एका बिगरगोमंतकीय तरूणाने आत्महत्येचा प्रयत्न करीत लोंबकळत असलेल्या स्थितीत बेतोडा गणेश मंदिर येथील पुरोहितांने त्याची पुणेरी स्टाईलने मनधरणी करत त्याचे प्राण वाचविण्यात यश मिळवले. याकामी फोंडा पोलीस, मायणा कुडतरी पोलीस व अग्निशामक दलाचे महत्वाचे मदतकार्य केले. तब्बल चार तास चाललेल्या थरारनाटय़ावर अखेर पुरोहिताच्या आगमनाने दुपारी 2.30 वा. सुमारास पडदा पडला. सदर घटना काल शुक्रवारी सकाळी 11 वा. सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार 11 वा. सुमारास पुणे येथील एक तरूण आत्महत्या करण्यासाठी बोरी पुलवर धडकला. तो बोरी पुलच्या लोखंडी कुंपणावर चढून दुसऱया बाजूने लोंबकळत राहिला. यावेळी वाहनचालकांनी थांबून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. लागलीच फोंडा पोलिस व त्यानंतर मायणा पोलीस तसेच फोंडा अग्निशामक दलाचे टिम घटनास्थळावर पोचले. नदीच्या दिशेने लोंबकळत स्थितीत असताना तो हात सोडण्याचा पवित्रा घेत असल्याचे साधून नदीच्या पात्रात होडयाही तैनात करण्याचे सोपस्कर पुर्ण करण्यात आले. शेवटी आकस्मितरित्या घटनास्थळी पोचलेल्या बेतोडा येथील श्री गणेश मंदिराचा पुरोहिताने त्याची पुणेरी स्टाईलने समजूत काढत त्याचे प्राण वाचविले त्यावेळी सरकारी यंत्रणेने सुस्कारा सोडला. तब्बल चार तासांनी या थरारनाटय़ावर पडदा पडला. त्या युवकाला मायणा पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास मायणा पोलीस करीत असल्य़ाची माहिती फोंडा पोलिसांनी दिली.