ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्याजवळील सासवडमध्ये काल (15 जून) सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. आता त्या महिलेच्या सहा वर्षाच्या मुलाचाही खून झाल्याचे समोर आले आहे. महिलेचे नाव आलिया शेख असून तिच्या मुलाचे नाव अयान शेख आहे. परंतु आलिया यांचे पती आबीद शेख मात्र गायब आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब पुण्यातील धानोरी भागात राहणारे असून चार दिवसांपूर्वी आबीद शेख यांनी पिकनिकला जाण्यासाठी ब्रीझा कार भाड्याने घेतली होती. हे कुटंब पिकनिकसाठी बाहेर पडले खरे पण काल सकाळी सासवड गावात आलिया यांचा तीक्ष्ण हत्याराने वार केलेला मृतदेह आढळून आला.
सासवड पोलीस त्या खुनाचा तपास करत असतानाच संध्याकाळी नवीन कात्रज बोगद्यालगत एका लहान मुलाचाही मृतदेह आढळून आला. तर आबीद शेख यांनी भाड्याने घेतलेली ब्रीझा कार पुणे-सातारा रस्त्यावर एका चित्रपटागृहासमोर सोडून दिल्याचे आढळून आली आहे. आबीद शेख हे एका एका कंपनीत ब्रान्च मॅनेजर म्हणून काम करतात.
पिकनिकसाठी घराबाहेर पडल्यानंतर नेमके काय झाले? आई-मुलाची हत्या का झाली तसेच आबीद शेख कुठे आहेत याचा तपास पोलीस करत आहेत.