विशाल कुदळे यांना ‘ज्युरी स्पेशल अवॉर्ड’
प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्ह्यातील फलटणचे सुपुत्र विशाल कुदळे यांना 19 व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये “ज्युरी स्पेशल अवॉर्ड” पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
विशाल कुदळे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘टक-टक’ या मराठी चित्रपटाचा या सोहळ्यात मराठी चित्रपट स्पर्धा विभागात सहभाग होता. यावेळी या चित्रपटाला ‘ज्युरी स्पेशल अवॉर्ड’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हा जगातील एक महत्वपूर्ण चित्रपट महोत्सव म्हणून ओळखला जातो. या पूर्वी “टक – टक” या सिनेमाला 25 हुन अधिक जागतीक व राष्ट्रीय महोत्सवामध्ये नामांकन व पारितोषिके मिळाली आहेत. तसेच आशिया बूक ऑफ रेकॉर्डस् ने सुद्धा या चित्रपटाचा गौरव केला आहे. दुबई येथे सुद्धा एक्स्पो दुबई 2020 मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे या चित्रपटाचा प्रयोग आयोजित केला गेला होता. महत्वाची बाब म्हणजे या संपूर्ण चित्रपटामध्ये केवळ एक कलाकार आहे. फलटणच्याच अनिश गोसावी याने यात भूमिका साकारली आहे. तसेच संपूर्णचित्रीकरण हे फलटण मध्येच श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मेडीयम स्कूल येथे झाले आहे.
या ‘टक-टक’ चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक विशाल कुदळे यांनी केले आहे. चित्रपटाचे निर्माते आकांशा राजे व विशाल कुदळे, छायांकन कार्तिककुमार भगत, एडिटर वर्धन धैमोडकर, साऊंड डिसायनर अनूप रुपनवर, कलाकर अनिश गोसावी व सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आशिष कलारिया यांनी काम पाहिले आहे.