प्रतिनिधी/वाकड
इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून आयटी अभियंत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रसून कुमार झा (वय २८, रा. लॉरेल सोसायटी, वाकड. मूळ रा. बिहार) असे आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. ही घटना आज, मंगळवारी दुपारच्या सुमारास वाकड येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसून हे हिंजवडी येथील इन्फोसिस या माहिती तंत्रज्ञान कंपनीत नोकरी करीत होते. ते मूळचे बिहार येथील असून मागील काही वर्षांपासून वाकड येथे राहत होते. दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रसून यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात आला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. वाकड पोलीस तपास करीत आहेत.