ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे शहरातील कोथरूडमधील महात्मा सोसायटीमध्ये रानगवा घुसल्याने अनेकांची पळापळ झालेली पाहायला मिळाली. त्याला बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, वाट चुकलेला रानगवा महात्मा सोसायटीच्या परिसरात सुरुवातीला दिसला. दरम्यान, कुत्र्यांच्या हल्ल्यात हा रानगवा जखमी झाला आहे. तर त्याला पकडण्यासाठी वनविभाग आणि महापालिकेचे पथकाने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतले होते. अखेर सहा तासांच्या नाट्यानंतर या रानगव्याला जेरबंद करण्यात यश आले आहे.
कोथरूड भागात आढळलेला रानगवा शहराच्या दिशेने पळाला. वनविभागाला चकवा देत रानगवा पळालाय. 50 ते 60 जण गव्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत होते. दाट लोकवस्तीच्या कोथरुड डेपो परिसरात रानगवा आढळून आला आहे. तो बिथरला असून पळतांना त्याच्या तोंडाला जखम झाली आहे.
ही माहिती समजताच रेस्क्यूसाठी वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्याला पकडण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती. ही मोहीम तब्बल तीन तासांनी यशस्वी झाली.
दरम्यान, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ यांनी रानगव्याला रेस्क्यू करण्यात यश मिळाले असल्याचे सांगितले असून त्यांनी वन विभाग, अग्निशमन दल आणि रेस्क्युत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.