- पुण्यात मानाच्या गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात
ऑनलाईन टीम / पुणे :
दरवर्षी महाराष्ट्रात गणपती बाप्पाला ढोल ताशांच्या गजरात, वाजत गाजत निरोप दिला जातो. पण यंदा कोरोना मुळे बाप्पाला अत्यंत साधेपणाने निरोप दिला जात आहे.
दरवर्षी पुणे शहरात मानाच्या गणपतींची मिरवणुक पाहण्यासाठी जगभरातून भाविक येत असतात. अलका चौकात तर भाविकांचा महापूर पहायला मिळतो. अलका चौकात मानाचे पाचही गणपती वाजत गाजत येतात. महापालिकेचा एक मंच त्यांच्या स्वागतासाठी सज्ज असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे मिरवणुक न काढता मंडपातच लाडक्या बाप्पाचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरात गणेश भक्तांची गर्दी आज दिसत नाही.
पुण्यातील पहिल्या पाच मानाच्या गणपतीच्या विसर्जनाची वेळ ही निश्चित करण्यात आली आहे. तर प्रमुख मंडळाकडून विसर्जन सोहळा ऑनलाईन दाखवला जात आहे.
परंपरेप्रमाणे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्याला महापौर मुरलीधर मोहळ यांच्या हस्ते अभिवादन आणि पुष्पहार अर्पण करत पुणेकरांच्या वतीनं अभिवादन करुन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश विसर्जनाला सुरुवात केली.
मानाच्या पहिल्या गणपतीचे म्हणजेच कसबा गणपतीचे विसर्जन महापौरांच्या हस्ते आरती करुन करण्यात आले. यासह सर्व गणपतीचे विसर्जन मंडपात बसवण्यात आलेल्या कृत्रिम हौदात करण्यात येणार आहे.
दगडूशेठ गणपती सह सर्व गणपतींचे विसर्जन रात्री 11 वाजेपर्यंत पार पडेल. पोलिसांकडून नागरिकांना घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. जवळपास 7 हजार पोलीस विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.