- महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करुन दिली माहिती
ऑनलाईन टीम / पुणे :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस फैलावत चालला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत पुण्यातील प्रमुख रुग्णालयात बेड्सची कमतरता जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार आता खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड्स कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येतील, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून दिली.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, खासगी रुग्णालयात 80 टक्के बेड्स कोविडसाठी राखीव ! कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व खासगी दवाखान्यातील 80 टक्के बेड्स कोविड उपचारासाठी उपलब्ध करुन देण्याबाबतचे आदेश आज काढण्यात आले आहेत. 31 मार्चपासून हे बेड्स कोविड रुग्णांना उपलब्ध होतील, असे सांगितले आहे.
सद्य स्थितीत पुणे शहरात साधारणपणे 5 हजार 8 बेड्स उपलब्ध आहेत. त्यातील सध्या केवळ 490 बेड शिल्लक आहेत. त्यात साध्या बेड्सची संख्या 243, ऑक्सिजन बेड 217, आयसीयू बेड 20 तर व्हेंटिलेटर बेड 10 आहेत. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार शहरात साधारण 2 हजार 682 बेड कमी पडत आहेत. शहरातील खासगी रुग्णालयांमधील 80 टक्के बेड पुन्हा ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.
- दिवसभरात 2 हजारपेक्षा अधिक नवे रुग्ण
दरम्यान, पुणे शहरात दिवसभरात 2,547 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 32 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 2 लाख 61 हजार 659 वर पोहोचला आहे. आजच्या दिवशी 2,771 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 2,23,541 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्य स्थितीत 32,875 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 674 रुग्णांची स्थिती गंभीर आहे. तर आता पर्यंत 5,243 जणांनी आपला जीव गमावला आहे.