ऑनलाईन टीम / पुणे :
सध्या कोरोनाची साथ पुणे शहरात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच कोरोना विरुद्धच्या प्रभावी लढ्यासाठी पुण्यातील गणेशोत्सव मंडळे सक्रीय सहभाग घेत आहेत. जय गणेश व्यासपीठच्या माध्यमातून मध्य पुण्यातील 272 हून अधिक गणेशोत्सव मंडळांनी आरोग्योत्सवाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरुन कामाला प्रारंभ केला. पुणेकरांचे सहकार्य मिळविण्यासाठी तसेच पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कातील व्यक्तींचे कॉन्टेक्ट ट्रेसिंग व होम आयसोलेशनसाठी पुणे मनपा प्रशासनाला सहाय्य करण्याकरीता मंडळांनी पुढाकार घेतला आहे.
बुधवार पेठेतील कोतवाल चावडी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या एसटीडी बुथ येथे कोविड मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, माणिकराव चव्हाण, कोविड 19 लोकसहभाग सहनियंत्रण अधिकारी राजेंद्र निंबाळकर, कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे आशिष महादळकर, महेश सूर्यवंशी, शिरीष मोहिते, नितीन पंडित, संजय बालगुडे, अॅड.प्रताप परदेशी, रवींद्र माळवदकर, भाऊ करपे, सुनील रासने आदी उपस्थित होते.
क्षेत्रीय कार्यालयाकडून पॉझिटिव्ह पेशंट संदर्भात कॉल आल्यानंतर पुणे मनपाचे प्रतिनिधी रुग्ण ज्या भागातील आहे, त्या भागातील मंडळांच्या प्रतिनिधिंना सूचना देतील. त्या भागातील स्थानिक कार्यकर्त्यांमुळे बाधित रुग्णाची संपूर्ण माहिती त्याच्या संपर्कात आलेल्या इतर सर्व व्यक्तींची माहिती मिळणे सोपे होईल. बाधित रुग्णाच्या घरातील परिस्थिती, त्याला घरीच विलगीकरणाला अनुकूल असेल तर त्याचे घरीच विलगीकरण करण्यास त्यांना कार्यकर्ते प्रोत्साहित करतील. ज्या रुग्णाला खरोखरच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची स्थिती असेल त्यालाच हॉस्पिटल मध्ये दाखल केले जाईल. तसेच या पद्धतीने पेशंटचे कॉन्टेक्ट ट्रेसिंग व होम आयसोलेशन अधिक प्रभावी होणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात कसबा-विश्रामबागवाडा या क्षेत्रिय कार्यालयांतर्गत हे काम सुरु होणार आहे. टप्याटप्याने याची व्याप्ती सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वाढविण्यात येणार आहे.