ऑनलाईन टीम / पुणे :
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी संगती निमित्त लोकगीत गायक नंदेश उमप व अभिनेते सुबोध भावे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. येत्या शुक्रवारी 31 जुलैला सकाळी 11 वाजता पत्रकार भवन येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन कर्माळकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती संवाद पुणेचे सुनील महाजन व समर्थ युवा फाउंडेशनचे राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
- ‘सांस्कृतिक पुणे’ डिजीटल व्यासपीठाचे अनावरण
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘सांस्कृतिक पुणे’ या डिजिटल माध्यमांना चे अनावरण प्रसिद्ध कवी संदीप खरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना संदिप खरे म्हणाले की, संवाद पुणे आणि समर्थ युवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या या डिजीटल व्यासपीठाद्वारे कलाकार आणि श्रोते यांच्यात दुवा साधला जाईल. करोनाच्या पार्श्वभुमीवर पुणेकर रसिकांसोबतच महाराष्ट्रासह, देशातील सर्वच पातळ्यांवरील नागरिकांना नाईलाजाने घरातच थांबावे लागत आहे. त्यांमुळे त्यांची सांस्कृतिक भूक भागविण्याच्या दृष्टीने संवादने उचलले हे पाऊल भविष्याची दिशा घेणारेच आहे. कोरोना संकाटामुळे अडचणीत आलेल्या कला क्षेत्राला हे व्यासपीठ नवसंजिवनी देण्याचे काम करेल यात शंका नाही.