ऑनलाईन टीम / सातारा :
पुणे-नगर महामार्गावर शिक्रापूर येथील 24 वा मैल येथे भरधाव ट्रकने दुभाजक ओलांडत कार आणि दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात पाच जण ठार झाले. तर पाच जण जखमी आहेत. रविवारी सायंकाळी हा अपघात झाला.
पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पुणे-नगर महामार्गावर शिक्रापूर येथील 24 वा मैल येथे पुण्याकडून अहमदनगरकडे जाणाऱ्या ट्रकचालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यामुळे हा ट्रक रस्त्याच्या मधील दुभाजक तोडून बाजूच्या मार्गिकेमध्ये घुसला आणि त्याने समोरुन येणाऱ्या कारसह दोन दुचाकींना धडक दिली. या विचित्र अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून, अन्य पाच जण जखमी आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातात मृत्यू झालेल्या तिघांची नावे समोर आली आहेत. विठ्ठल हिंगाडे, रेश्मा हिंगाडे, लीना नीकसे अशी तिघांची नावे असून, अन्य दोघांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.