वसगडे / वार्ताहर
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाच जिल्ह्याचे राजकिय वातावरण चांगलेच ढवळुन निघाले. महाविकास आघाडीचे अरुण लाड व भारतीय जनता पार्टीचे सग्रांम देशमुख यांच्यातच प्रमुख लढत झाल्याचे दिसून आले. २५ वर्षे एकत्रित राजकारण केलेल्या पलूस आणि कडेगाव पदवीधरांची ही निवडणुक अटीतटीची झाली. त्यामुळे लाड यांच्यासाठी अस्तित्वाची तर देशमुखांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली. मताचा टक्का वाढल्याने दोन्ही गटांनी विजयाचा दावा केला. त्यामुळे अरुण लाड यांचे विजयी डिजिटल पुण्यात लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मतमोजणीला सुरवात झाल्याने चौकाचौकात पारावरच्या गप्पांना उधाण आले आहे. त्यामुळे पुणे पदवीधर विधानपरिषदेच्या निवडणुकीत आता पलूस-कडेगाव मतदारसंघांचा कोण आमदार आणि कोण ‘बाजीगर’ ? याची उत्सुकता चांगलीच शिगेला पोचली आहे.
मताधिक्य देण्यासाठी कृषीराज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी जोरात प्रयत्न चालविले होते. तसेच माजी आ. पृथ्वीराज देशमुख यांनी आपल्या छोट्या बंधुला पदावर बसविण्याची ‘हॅट्रिक’ करण्यासाठी फ्रंटफ्रुट न राहता अंडरग्राऊंड राहुनच काम करण्याचे पसंत केल्याचे दिसले.
मतदारसंघांतील ६६% मतदान झाले. विजयासाठीचा हा टक्का कोणाला उपयोगी पडणार हे मतपेटीतून आता थोडया वेळातच समजेल.