ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यातील कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये काल रात्री 11 च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. त्यानंतर तब्बल तीन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश मिळाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यात फॅशन स्ट्रीट मार्केटमधील तब्बल 400 ते 500 दुकाने आगीच्या कचाट्यात सापडली आहे. तसेच या आगीमुळे व्यापारांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या कॅम्प परिसरात असणाऱ्या फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये रात्री 11 च्या सुमारास भीषण आग लागली. ही आग कशामुळे लागली याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण या ठिकाणी कपड्याची मोठी दुकाने आणि गोदामे असल्याने ती आग वेगाने पसरली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. फॅशन स्ट्रीटचा भाग अत्यंत अरुंद रस्त्यांचा असल्याने अग्निशमन दलाला ही आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, फॅशन स्ट्रीटचा परिसरात कपड्यांची अनेक दुकाने, गोदाम असल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान ही आग नेमकी कशी लागली? किती वाजता लागली? याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.