उचगाव / प्रतिनिधी
गांधीनगर पोलिस ठाण्याचे हद्दीत उचगाव जवळ पुणे बेंगलोर महामार्गावर टेम्पोंतून पानमसाला व सुगंधी तंबाखू (गुटखा) वाहतूक करणाऱ्या टेम्पोंला पाठलाग करीत पकडून २१लाख ४४ हजाराचा पानमसाला व सुगंधी तंबाखू व १२ लाखाचा टेम्पों असा एकूण सुमारे ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत जमीर हारुण पटेल (वय ३८ रा.कराड) या मालकास गांधीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. रविवारी साडेदहाच्या सुमारास गुटख्याची पोती घेवून टेम्पों महामार्गावरुन जात असल्याची खबर गांधीनगर पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले यांना मिळाली. त्यांनी पोलिस हवालदार आकाश संभाजी पाटील यांना टेम्पोंची माहीती दिली. पोलिसांनी पाळत ठेवून उचगाव येथे सापळा रचला. उचगाव महामार्गावर पेट्रोल पंपानजीक खणीजवळ टेंम्पोचा पाठलाग करुन माल हस्तगत केला.
मोठ्या प्रमाणात पानमसाला व सुगंधी तंबाखूची पोती व १२ लाखाचा टेम्पों पोलिसांनी जप्त केला आहे. करवीरचे पोलिस उपअधिक्षक आर.आर.पाटील यांनी कारवाईचे कौतुक करून तपासाबद्दल योग्य सूचना दिल्या. सपोनि सत्यराज घुले,पोलिस हवालदार मोहन गवळी,आकाश पाटील,आयुब शेख,दिगंबर सुतार या पथकाने कारवाई केली.गांधीनगर पोलिसांची अलिकडच्या काळात सर्वात मोठी कारवाई आहे.