पुलाची शिरोली / वार्ताहर
पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वारंवार घडणारे अपघात. यामुळे होणारी मनुष्यहानी व आर्थिक नुकसान या बाबत ठोस निर्णय व्हावा. तसेच कायमस्वरूपी उपाययोजना होण्यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी महामार्गावर पहाणी केली. याबाबचा अहवाल सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना देण्यात आला.
गेली दोन महिन्यात शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील पूणे बंगलूर राष्ट्रीय महामार्गावर वरचेवर घडणारे अपघात, ब्लॅक स्पॉट, वारंवार उद्भभवणारी वाहतूक कोंडी आदी समस्या याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी रस्ता सुरक्षा समितीला अहवाल सादर केला होता. या पाहणीनंतर योग्य ती उपाययोजना साठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच जिल्हाधिकारी यांना महामार्गावरील अपघातांची ठिकाणे व त्यावरील उपाय कोणते असावेत याचा सविस्तर अहवाल खांडवे यांनी सादर केला आहे.
शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली फाटा, एमआयडीसी फाटा, नागाव फाटा, शेतकरी पेट्रोल पंप टोप हद्द, शिये फाटा आदी ठिकाणी वरचेवर अपघात होतात. त्यातून कित्येक जण जायबंदी होतात. तर कित्येक जण मृत्यूला सामोरे जातात. या गोष्टीचा विचार करून शिरोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश खांडवे यांच्या अहवालानुसार रस्ता सुरक्षा समितीचे सहाय्यक अभियंता एन.के.कांबळे,कनिष्ठ अभियंता किरण कांबळे, मोटर वाहन निरीक्षक विशाल बागडे, राष्ट्रीय राज्य महामार्गाचे महेश पाटोळे, सहा. पोलीस निरीक्षक राजेश खांडवे, वाहतूक पोलीस कर्मचारी मेतके यांनी या रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर सांगली फाटा येथे फ्लाय ओव्हर, नागाव फाटा येथे उड्डाणपूल, कासारवाडी टोप येथे उड्डाणपूल याबाबत योग्य ते उपाय योजना करण्याची चर्चा झाली.