शनिवार वगळून आठवडय़ातील 6 दिवस सेवा : पुणे-बेळगाव अंतर सव्वा तासात कापणार
प्रतिनिधी / बेळगाव
मागील काही दिवसांपासून बंद असलेली पुणे-बेळगाव ही विमानफेरी रविवार दि. 28 पासून पूर्ववत करण्यात येणार आहे. अलायन्स एअरने 78 आसन क्षमता असणारे विमान पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे बेळगावहून पुण्याला विमान प्रवास करणाऱयांसाठी सोयीचे ठरणार आहे. शनिवार वगळता इतर 6 दिवस ही सेवा दिली जाणार आहे.
अलायन्स एअर यापूर्वी पुणे-बेळगाव-बेंगळूर व बेंगळूर-बेळगाव-पुणे अशी सेवा देत होते. परंतु तांत्रिक कारणामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ापासून ही फेरी बंद करण्यात आली होती. बेळगाव ते पुणे असा प्रवास करणाऱयांची संख्या अधिक असल्याने ही फेरी पूर्ववत करण्याची मागणी केली जात होती. बेळगाव-पुणे हा उडान-3 अंतर्गत मंजूर झालेला मार्ग असल्याने ही फेरी पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
हैदराबादला आणखी एक कनेक्टिंग फ्लाईट
अलायन्स एअरने पुणे-बेळगाव-बेंगळूर ही फेरी रद्द करून आता हैदराबाद-पुणे-बेळगाव अशी विमानफेरी सुरू केली आहे. यामुळे हैदराबाद शहराला बेळगावमधून आणखी एक कनेक्टिंग फ्लाईट उपलब्ध झाली आहे. यापूर्वी ट्रूजेट, इंडिगो, स्पाईस जेट या तीन कंपन्या हैदराबाद शहरासाठी विमानसेवा देत होत्या. आता यात अलायन्स एअरची भर पडली आहे. पुणे येथून सकाळी 9.05 वा. निघालेले विमान बेळगाव विमानतळावर 10.25 वा. पोहोचणार आहे. सकाळी 10.50 वा. बेळगाववरून निघालेले विमान 12.10 वा. पुण्याला पोहोचणार आहे. परंतु या नव्या फेरीमुळे बेंगळूरला जाणाऱया विमानांची संख्या कमी झाली आहे. स्पाईस जेट व इंडिगो या कंपन्या बेंगळूर शहराला दररोज विमानसेवा देत असून स्टार एअर आठवडय़ातून मोजके दिवस सेवा देते. अलायन्सने बेंगळूर फेरी रद्द केल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.