ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे महानगरक्षेत्रात कोरोनाबाधितांवर 19 रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
म्हैसेकर म्हणाले, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात वेगवेगळया 19 शासकीय व खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने काही खासगी रुग्णालयांबरोबर यासंदर्भात करार केला आहे. तसेच राज्य शासन याबाबत धोरणात्मक निर्णय घेत असून खर्चाची प्रतिपूर्ती कशी करावी, याअनुषंगाने शासनाकडून मार्गदर्शक तत्वे अपेक्षित आहे. तथापि, तोपर्यत वेगवेगळया रुग्णालयांच्या सेवा प्राप्त करून घेण्यात येत आहेत. या सेवांमार्फत कोरोनाबाधित रुग्णांना सेवा देण्यात येत आहे.
कोरोनाबाधित महिलांच्या प्रसूतीसाठी ससून व महानगरपालिकेच्या सोनवणे रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली असून, काही खासगी रुग्णालयांशी महापालिका करार करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.