ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोनाचा धोका अजूनही टळला नसून रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आपण या काळातील सर्व सण साध्या पद्धतीने साजरे केले आहेत. त्याप्रमाणेच यंदा गणेशोत्सवही साध्या पद्धतीने साजरा करावा तसेच यंदा गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना मंडपात न करता, गणपती मंदिरात बसवण्याचे आवाहन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी गणेश मंडळांना केले आहे.
यंदाच्या वर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज पुणे महापालिकेत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे तसेच शहरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
महापौर मोहोळ म्हणाले, दरवर्षी आपण सर्वजण गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो. मात्र, यंदा आपण कोरोनाच्या संकटाचा सामना करीत आहोत. हा संसर्ग रोखण्यासाठी यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा तसेच सर्व गणेश मंडळांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच यावर्षी कोणत्याही स्वरूपाच्या मिरवणुका काढण्यात येणार नसून भाविकांना डिजिटलच्या माध्यमातून दर्शनाची व्यवस्था करावी. त्याचबरोबर गणेशमूर्तीचे विसर्जन मंडळांच्याजवळच, तर घरगुती गणपतींचे विसर्जन घरीच करावे, असे आवाहन देखील महापौरांनी यावेळी केले.