पुणे / प्रतिनिधी :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 116 वा पदवीप्रदान समारंभ आज (बुधवारी) आयोजित करण्यात आला आहे. त्यात पीएचडी ते प्रमाणपत्र अशा एकूण 1,09,930 (एक लाख नऊ हजार नऊशे तीस) पदव्या प्रदान केल्या जाणार आहेत. या पदव्यांमध्ये 116 सुवर्णपदके आणि 389 पीएचडी पदव्यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून हरियाणामधील फरिदाबाद येथील ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिटय़ूटच्या कार्यकारी संचालक प्रा. (डॉ.) गगनदीप कंग उपस्थित राहणार आहेत. त्या स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करतील. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. हा मुख्य कार्यक्रम दुपारी 3 वाजता होणार आहे.
शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये किंवा त्यापूर्वी विविध विद्याशाखांमधील पदव्युत्तर स्तरावरील 22370 विद्यार्थ्यांना विद्यापीठात पदवीप्रमाणपत्रे वितरित केली जाणार आहेत. याशिवाय पदवी स्तरावरील 87560 विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयाकडून 9 फेबुवारीपर्यंत पदवी प्रमाणपत्रे वितरित केली जाणार आहेत. जे विद्यार्थी या मुदतीपर्यंत प्रमाणपत्रे घेणार नाहीत, त्यांची प्रमाणपत्रे महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांनी दिलेल्या पत्यावर पाठवून दिली जाणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयांशी संपर्क साधावा, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अरविंद शाळिग्राम यांनी दिली.
पदव्युत्तर स्तरावरील पदवी प्रमाणपत्रांचे वितरण विद्यापीठ परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या परीक्षा भवनमध्ये सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळात केले जाणार आहे. उर्वरीत प्रमाणपत्रे तसेच, बहिःस्थ विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे विद्यापीठाकडून पोस्टाने विद्यार्थ्यांच्या पत्यावर पाठवून दिली जातील, असेही डॉ. शाळिग्राम यांनी सांगितले.