ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यातील प्रसिद्ध अखिल मंडई गणपती मंडळाच्या शारदा गजानन गणपती मंदिरात चोरी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी पहाटेच्या मंदिरातील 25 तोळे सोन्याचे दागिने आणि दान पेटीतील रक्कम चोरीला गेली आहे.
या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
या घटनेबाबत माहिती देताना मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी सांगितले की, मंदिराच्या मुख्य मंडपात आज रात्री 1.30 ते 2.30 च्या दरम्यान तोंडाला मास्क लावून एकाने आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्याने बापाच्या मूर्तीवरील दोन सोन्याचे हार, एक मंगळ सूत्र, कंठी असे मिळून अंदाजे 25 तोळे सोने आणि दान पेटी मधील काही रक्कम चोरली आहे.
ही चोरी करत असताना आरोपीच्या चेहर्यावरील मास्क खाली आल्याने, त्याचा चेहरा दिसून आला आहे. हा सर्व प्रकार मंदिरामधील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून या घटनेची माहिती मिळताच आम्ही याबाबत पोलिसांना माहिती दिली असून पोलिस घटनेचा तपास करीत आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.