पुणे / प्रतिनिधी
पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गांवरील टोल रद्द करण्यात केल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पुण्यात केली. या मार्गाच्या विकासासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून 50 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून पुणे जिल्हÎातील विविध विकासकामांचे भूमीपूजन व लोकार्पणाचा कार्यक्रम गडकरी यांच्या उपस्थितीत कात्रज येथे पार पडला. त्यावेळी गडकरी बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे, पालकमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते.
पुणे-बेंगळूर नवा ग्रीन हायवे
गडकरी म्हणाले, दोन महामार्गांचा विकास करण्याचे ध्येय प्राधिकरणाने समोर ठेवले आहे. यातील पहिला पुणे-बेंगळूर हा नवीन ग्रीन हायवे एक्सीस कंट्रोल आम्ही बांधत आहोत. यामुळे पुण्यावरील वाहतुकीचा ताण भविष्यात कमी होणार आहे. या रस्त्याच्या बाजूला नवीन पुणे विकसित करण्याचा प्रस्तावही आहे. या महामार्गाचे सादरीकरण महाराष्ट्र सरकारला देऊन, याच्या कामाला सुरुवात होणार आहे. तसेच या मार्गावर होत असलेले अपघात व त्यावरील उपयायोजना एक खासगी संस्था करीत असून, लवकरच याचा अहवाल सादर केला जाणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
नव्या महामार्गाची जमीन राज्य सरकारने खरेदी करावी
पुणे-बेंगळूर 40 हजार कोटीचा नवा महामार्ग बांधण्याची योजना आहे. हा मार्ग फलटण, सोलापूरवरून जाणार आहे. या रस्त्याशेजारच्या जमिनी राजकारणी विकत घेतील. त्यापेक्षा ती राज्य सरकारने विकत घ्यावी. मीदेखील मदत करायला तयार आहे. एनएचएकडून 8-10 हजार कोटी रुपये देण्यास तयार आहे. पुण्याबाहेर नवीन पुणे उभारण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
पुणे-मुंबई मार्गावरील ताण कमी करणार
इपुणे मुंबईवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यावरही भर दिला जाणार आहे. यासाठी नवीन महामार्ग बांधला जाणार आहे. दक्षिणेकडील आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ तसेच उत्तरेतील पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात दिल्ली, हिमाचल, उत्तराखंड येथील वाहतूक मुंबई-पुण्याकडे येत असते. हे ट्राफिक सुरतलाच थांबवून सुरतपासून नाशिक, अहमदनगर, सोलापूर, अक्कलकोट, गुलबर्गा, यादगीर, कर्नुल, चेन्नई अशा मार्गाचा प्रस्ताव आहे. हा महामार्ग 1270 किमीचा असेल. यासाठी 40 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यामुळे दिल्ली- चेन्नई प्रवासात आठ तासांची बचत होणार आहे. यामुळे महाराष्ट्राला फायदा होईल. याबरोबरच पुण्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असणारा रिंगरोड प्रकल्पासही आम्ही मदत करण्यास तयार असून, भूसंपादन करून दिल्यास पुढील सर्व खर्च व बांधकाम आम्ही करू, असे आश्वासन गडकरी यांनी दिले.