- केमिकलच्या उग्र वासाने नागरिकांना त्रास; गॅस गळतीच्या भीतीने खळबळ
ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे शहरात गरवारे कॉलेजच्या बाजूला असलेल्या सेंट्रल मॉल परिसरात गॅस गळतीची घटना घडली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, अग्नीशमन दलाचे कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सेंट्रल मॉलमध्ये केमिकलचा उग्र वास येत होता. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत होता. या बाबतची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाचे अधिकारी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, मॉलच्या पार्किंगमध्ये केमिकल पावडर आढळल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.
अग्निशमन दलाच्य जवानांनी पाहणी केली असता मॉलच्या पार्किंगमध्ये केमिकल पावडर आढळून आली आहे. या केमिकल पावडरमुळे गॅस निर्माण झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पार्किंगमधील ती पावडर बाहेर काढून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आली आहे. आता मॉलमध्ये ही पावडर कुठून आली याचा तपास केला जात आहे.
एनसीएलचे अधिकारी हा तपास करणार आहेत. गॅस गळतीची शक्यता लक्षात घेता मॉल रिकामा करण्यात आला होता. मॉलमधून जवळपास 300 लोकांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पाण्याचा मारा करीत अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलेे. त्यानंतर काही वेळातच हा मॉल नागरिकांसाठी सुरू करण्यात आला.