ऑनलाईन टीम / पुणे :
त्रिदल -पुणे आणि ‘पुण्यभूषण फौंडेशन’ची ‘पहाट दिवाळी’ संगीत मैफल यंदा ऑनलाईन साजरी होणार असून पुण्यभूषण च्या निवडक पहाट मैफिलींचा स्मृतिगंध पुणेकरांच्या भेटीला येणार आहे !
‘दीपसूर तेजाळती’ असे या पहाट मैफिलीचे नाव असून शनिवार ,14 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आली आहे. ‘पुण्यभूषण फौंडेशन ‘चे संस्थापक डॉ सतीश देसाई यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
रोटरी क्लब 3131 च्या प्रांतपाल रश्मी कुलकर्णी, डॉ सतीश देसाई हे या पहाट दिवाळीचे आयोजक असून मकरंद टिल्लू यांनी संयोजन सहकार्य केले आहे. यू ट्यूब आणि फेसबुक लाइवद्वारे ही मैफल रसिकांच्या भेटीस येणार आहे .
‘1993 साली ‘त्रिदल’ संस्थेने प्रथम ‘दिवाळी पहाट’ मैफिलीच्या संकल्पनेला प्रारंभ केला आणि आता जवळपास प्रत्येक गल्लीत, गावात दिवाळी पहाट साजरी होते. या संकल्पनेमुळे दिवाळी अधिक रंगतदार होऊ लागली आणि नवनवीन प्रतिभांना व्यासपीठ मिळाले. यंदा कोविड साथीमुळे जाहीर मैफल शक्य नसली तरी ऑनलाईन माध्यमातून ही परंपरा सुरू ठेवली जाणार आहे, असे डॉ. सतीश देसाई यांनी सांगीतले.