ऑनलाईन टीम / पुणे :
बाणेर येथील पॅनकार्ड क्लबच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाडय़ा दाखल झाल्या असून, आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करत आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी एक वाजण्याच्या वाजण्याच्या सुमारास अचानक पॅनकार्ड क्लबच्या इमारतीच्या डोमला आग लागली. स्थानिकांनी तात्काळ याची माहिती अग्निशमन दलाला दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या. इमारतीचा डोम उंच असल्याने धूराचे लोट संपूर्ण इमारतीत पसरले आहेत. अग्निशमन दलाचे जवान चारही बाजूने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.