ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे जिल्ह्यात सकाळपासून घोंगावणाऱ्या वादळाने वीजयंत्रणेवर बुधवारी मोठा आघात केला. वीजयंत्रणेवर मोठी झाडे व फांद्या कोसळल्याने प्राथमिक माहितीनुसार सुमारे 540 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. यामध्ये प्रामुख्याने मावळ, जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्मयांमधील 340 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरक्षिततेच्या कारणासाठी बंद ठेवण्यात आला. तसेच पुणे शहराच्या विविध भागात तसेच पिंपरी-चिंचवड व भोसरीमधील बहुतांश भागात वीजपुरवठा विस्कळीत झाला.
निसर्ग चक्रीवादळाने राज्याच्या किनारपट्टीला जोरदार तडाखा. या वादळाचे परिणाम पुणे व परिसरातही पहायला मिळाले. वादळामुळे महावितरणच्या वीजयंत्रणेचे शहरी व ग्रामीण भागात मोठे नुकसान झाले असून त्याबाबतची स्थिती गुरुवारी सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. तसेच महावितरणचे सर्व अभियंते व कर्मचारी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे करीत आहेत. बुधवारी रात्री उशिरापर्यंत खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू होते. महावितरणचे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांनी यासंदर्भात माहिती दिली.
मावळ, खेड तालुक्मयांमधील राजगुरुनगर, चाकण, वडगाव, तळेगाव, लोणावळा या परिसरातील 82 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरक्षिततेच्या कारणासाठी बंद ठेवण्यात आला आहे. यासह जुन्नर, आंबेगाव तालुक्यांमधील भीमाशंकर, घोडेगाव, नारायणगाव, जुन्नर, पिंपळवंडी, नारायणगाव, नाणेघाट, मंचर, डिंभे, आपटाळे, ओतूर, आळेफाटा या परिसरातील सर्व 215 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठादेखील बंद ठेवण्यात आला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत वादळासह पावसाचे थैमान सुरू असल्याने वीजवाहिन्या पूर्ववत करण्याच्या कामात अडथळे येत होते.
पिंपरीलाही तडाखा
पिंपरी चिंचवड व भोसरीमध्ये वादळी पावसामुळे वीजयंत्रणेला मोठा तडाखा बसल्याने बहुतांश भागातील वीजपुरवठा बंद पडला. पिंपरी, चिंचवड, भोसरी, रावेत, आकुर्डी, मोशी, चऱहोली, सांगवी, वाकड, बिजलीनगर, खराळवाडी, पिंपळे सौदागर आदी भागांतील सुमारे 112 वीजवाहिन्यांवर झाडे किंवा फांद्या पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला.
पुणे अंधारात
पुणे शहरात वादळी पावसामुळे 85 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला. यामध्ये रास्ता पेठसह कोंढवा, हडपसर, मगरपट्टा, कोरेगाव पार्क, कोथरूड, शिवणे, वारजे परिसर, बिबवेवाडी, धनकवडी, कात्रजसह विविध भागांचा समावेश होता. त्यामुळे अर्धेअधिक शहर अंधारातच होते.