प्रतिनिधी / मडगाव :
झरीवाडा-दवर्ली येथे आपल्या नातेवाईकांकडे पुण्यातून आलेली एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली असून तिला उपचारासाठी शिरोडा येथील कोरोना निगा केंद्रात पाठविण्यात आले आहे. या महिलेच्या स्वॅब चाचणी अहवाला सदंर्भात निष्काळजीपणा झाल्याचा दावा केला जात आहे.
ही महिला पुण्यातून गोव्यात येताना, तिची स्वॅब चाचणी घेण्यात आली व चाचणी झाल्यानंतर चार दिवसात अहवाल कळविण्यात येणार असल्याची कल्पना दिली होती. चार दिवस झाले तरी अहवाल उपलब्ध झाला नाही. त्यामुळे या महिलेने स्वॅब चाचणी अहवाल देणाऱया यंत्रणेकडे संपर्क साधला असता तिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याची कल्पना देण्यात आली.
चार दिवसात अहवाल दिला जाणार असल्याचे सांगून देखील तो दिला नाही. हा स्वॅब चाचणी करणाऱया यंत्रणेचा निष्काळजीपणा असल्याचा ठपका या महिलेच्या नातेवाईकांनी ठेवला आहे. पुण्यातून आलेली ही महिला नातेवाईकांच्या घरात वावरल्याने आत्ता त्यांनाही चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.
दरम्यान, ही महिला झरीवाडा-दवर्ली येथे ज्या घरात उतरली होती. त्या घराचे तसेच घरासभोवताली काल गुरूवारी अग्निशामक दलाने निर्जंतुकीकरण केले.