पुणे / प्रतिनिधी :
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना, भारतीय कामगार सेना आणि चित्रपट सेना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक महोत्सवा’चे आज आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात युवा तसेच ज्येष्ठ कलाकारांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे, तर ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे यांना ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने गौरविण्यात येणार असल्याची माहिती महोत्सवाचे आयोजक, शिवसेना उपनेते, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस, किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) रघुनाथ कुचिक यांनी निवेदनाद्वारे दिली.
हा महोत्सव बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला असून, संपूर्ण दिवसभर चालणाऱया या महोत्सवाचे उद्घाटन सकाळी 9ः30 वाजता विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱहे यांच्या हस्ते होणार आहे. अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या माजी अध्यक्षा कीर्ती शिलेदार आणि शिवसेनेचे सचिव, शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
विशेष पुरस्काराचे मानकरी
कथ्थक नृत्यगुरू मनिषा साठे, भतरनाट्यम नृत्यगुरू डॉ. स्वाती दातार, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, अभिनेता तेजस बर्वे, चित्रकार घनश्याम देशमुख, तालमणी केदार मोरे, चित्रपट कॅमेरा पुरवठादार कौशल शहा, चित्रपट लाईट पुरवठादार स्वप्नील वेंगुर्लेकर, लावणी सम्राज्ञी छाया खुटेगावकर आणि सीमा पोटे यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.