पुणे / प्रतिनिधी :
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने ‘लोकमान्य टिळक-आधुनिक भारताचे शिल्पकार’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून (बुधवार) ते शुक्रवार 24 जानेवारी या कालावधीत विद्यापीठाच्या गुलटेकडी येथील संकुलातील जयंतराव टिळक सभागृहात ही परिषद होईल. परिषदेत आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक शिक्षणतज्ञ, संशोधक आणि अभ्यासक सहभागी होत आहेत. कुलगुरू डॉ. दीपक टिळक आणि परिषदेच्या निमंत्रक डॉ. गीताली टिळक यांनी ही माहिती दिली.
यंदाचे वर्ष भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे थोर सेनानी लोकमान्य टिळक यांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. त्याचबरोबर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शताब्दी वर्षाला प्रारंभ होत आहे. हे औचित्य साधून ही आंतरराष्ट्रीय परिषद होत असल्याचे डॉ. दीपक टिळक यांनी नमूद केले. उद्घाटन सोहळय़ात मलेशियातील लीनकॉल्न विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलगुरु डॉ. अमिया भौमिक, इनफ्लबिनेटचे संचालक प्रा. जे. पी. सिंग जुरेल, नेपाळच्या त्रिभुवन विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक डॉ. सुरेंद्र केसी यांची उपस्थिती आहे. नालंदा विद्यापीठाचे कुलगुरु, संगणकतज्ञ डॉ. विजय भटकर, तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक डॉ. शंकर अभ्यंकर, सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन आयुषचे अध्यक्ष डॉ. जयंत देवपुजारी, इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. राजा दीक्षित, प्रा. वैजयंती नरवणे, जपानच्या ओझाकी हिरोको, चिदा सतोमी, तसेच इसोगाई टोमिओ, केंद्रीय जलसंशोधन संस्थेच्या संचालिका डॉ. व्ही. व्ही. भोसेकर यांसह विविध संशोधक, वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.
परिषदेसाठी 200 शोधनिबंध आले आहेत. विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांसह पाचशेहून अधिक व्यक्ती या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणार आहेत. लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित एक नाटिका टिमवि आर्ट सर्कलने बसविली असून, ती या परिषदेत सादर केली जाणार आहे. लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त टिमविच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे.