ऑनलाईन टीम / पुणे :
शनिवारी संध्याकाळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. त्यानंतर आता त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समजतंय. कुटंबातील आठ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
मोहोळ आपल्या ट्विटमध्ये म्हणाले होते की, थोडासा ताप आल्याने मी माझी कोविड-19 ची टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहीन. मात्र, यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या कुटुंबीयांची चाचणी केली असता 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट आला आहे.
दरम्यान, पुण्यातील भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांनाही करोनाची बाधा झाल्याचे रविवारी सकाळी स्पष्ट झाले. त्यांनीही ट्विटद्वारे आपला चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जाहीर केले. दोन दिवसापूर्वी ताप व कणकण आल्याने माझी व मुलाची करोनाची तपासणी करून घेतली असताना हा अहवाल पॉझिटिव्ह आला. माझी प्रकृती स्थिर आहे. तुमच्या आशिर्वादामुळे लवकरच बरा होऊन येईन. आपण सर्वांनी काळजी घ्यावी व सुरक्षित राहावे, असे ट्विट त्यांनी केले आहे.